बासरीवर अलगद बोटे फिरली तीच बोटे तबल्यावर थिरकली अन् सितार – गिटारावर त्या बोटांनी कमालीची जादू केल्याने वाद्ये बोलू लागल्याने रसिक प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले. ही किमया घडली ती म्हणजे तालपरिक्रमा कार्यक्रमात… शास्त्रीय, उपशास्त्रीय ते हिंदी चित्रपटांच्या संगीतात वापरल्या जाणाऱ्या विविध तालांच्या तालपरिक्रमा कार्यक्रम मोठ्या दिमाखात पार पडला. तबला, बासरी, सितार, जेंभे अशा एकापेक्षा एक प्रकारच्या वाद्यांतून एक ताल, रूपक ताल, दादरा ताल, केरवा ताल, अर्धा ताल, तीन ताल, दिपचंधी ताल अशा तालांची निर्मित करून मराठी आणि हिंदी चित्रपटांतील अजरामर गीतांचे ताल सादर करण्यात आले.
पाच तबला वादकांना बासरी, सितार, जेंभे यांनी मोलाची साथ दिली. विविध ताल सादर करताना वादकांची रंगलेली जुगलबंदी रसिकांना याची देही याची डोळा पाहायला मिळाली. समीर सुर्यवंशी प्रस्तुत व सहजीवन गणेश मित्र मंडळ ट्रस्ट, सहकारनगर येथे कार्यक्रम आयोजित केला होता. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सतारवादक शाखिर खान हे कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तबला – आकाश मोरे, वेदांग ठोंबरे, स्वप्नील दिक्षीत, आकाश निमसाखरे, सितार – आदित्य देशपांडे, बासरी – अझरूद्दीन शेख, जेंभे – गणेश बोज्जी, गिटार – आलाप श्रीवास्तव या वादकांनी साथ केली तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेश दातार यांनी केले तर आभार नितीन पाटील व विनय कुलकर्णी यांनी मानले. तर “तराना” या संगीत रचनेने तालपरिक्रमा कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.