शबनम न्युज | पुणे
राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, उद्योजकांना उपलब्ध करुन दिलेल्या उच्च दर्जाच्या सुविधा, औद्योगिक वसाहतीत केलेली पायाभूत सुविधांची कामे यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर परकीय गुंतवणूक आली असून उद्योगस्नेही धोरणामुळे महाराष्ट्र राज्य परकीय गुंतवणूकीत प्रथम क्रमांकावर आहे असे प्रतिपादन उद्योग मंत्री उदय सामंत यांनी केले.
‘महाराष्ट्राची उद्योग भरारी’ या उद्योग विभागाच्यावतीने गणेश कला क्रीडा रंगमंच येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. खासदार श्रीरंग बारणे, विभागीय आयुक्त डॉ.चंद्रकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे सहमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल भंडारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.शिवाजी पाटील, उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत, मुख्य अभियंता नितीन वानखेडे यावेळी उपस्थित होते.
मी स्वत: उद्योजक असून उद्योजकांच्या अडचणींची आणि त्यांच्या समस्येची मला चांगली जाणीव आहे असे सांगून उद्योगमंत्री सामंत म्हणाले, महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम उद्योग विभागातर्फे राबविण्यात आलेल्या योजनांची पारदर्शकता दाखविणारा आहे. उद्योगांसाठी शासन सकारात्मक आहे. महाराष्ट्रात सात ठिकाणी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. आतापर्यत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. लहान आणि मोठया उद्योजकांचे महाराष्ट्रात स्वागतच आहे. उद्योग क्षेत्रात पुरुषांसोबतच महिलाही पुढाकार घेत आहे. राज्याच्या उद्योगस्नेही धोरणामुळे एकही उद्योग राज्याबाहेर गेला नाही. उद्योग विभागावर केलेल्या टिकेमुळे महाराष्ट्राचे नुकसान होते हे टिका करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे असे त्यांनी सांगितले केले.
औद्योगिक क्षेत्रात जवळपास पंच्याहत्तर हजार कोटी रुपयांची गुतवणूक आली असून परकीय गुंतवणूकीत महाराष्ट्र देशात प्रथम क्रमांकावर आहे. सुमारे अडीच हजार कोटी रुपये खर्चून राज्यातील २८९ औद्योगिक वसाहतींमध्ये पायाभूत सोईसुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. बीडकीन औद्योगिक क्षेत्रात ५२ हजार कोटी रुपयांची, एक लाख कोटी रुपयांची विदर्भात तसेच कोकण औद्योगिक क्षेत्रात १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असल्याचे सांगितले.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेद्वारे महिलांना शासनातर्फे आर्थिक मदत करण्यात येते. ही रक्कम बाजारात येण्यामुळे त्याचा उद्योग क्षेत्राला फायदा होणार असल्याचे सामंत यांनी सांगितले. यावेळी मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेंतर्गत १० नवीन उद्योजकांना उद्योगमंतत्र्यांच्याहस्ते पाच कोटी रुपयांच्या अनुदानाचे वितरण करण्यात आले.
खासदार श्री.बारणे म्हणाले, उद्योजकांचा उद्योग विभागातर्फे सत्कार करणे चांगली संकल्पना आहे. पुणे व परिसरातील उद्योजक व कामगारांच्या समस्या सोडविण्याला शासनाने प्राधान्य दिले असून, रिंग रोड व मेट्रोच्या जाळयामुळे वाहतूक समस्या सुटण्यास मदत झाली आहे.
विभागीय आयुक्त डॉ.पुलकुंडवार म्हणाले, महाराष्ट्र हे प्रगत राज्य असून त्यामध्ये औद्योगिक क्षेत्राचा मोठा वाटा आहे. उद्योगस्नेही धोरणामुळे उद्योगांची भरभराट झाली आहे. विभागीय आयुक्त या नात्याने विभागातील उद्योजकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल व प्रशासनाकडून उद्योजकांना सर्व प्रकारचे सहकार्य देण्यात येईल असे सांगितले.
सहमुख्य कार्यकारी अधिकारी श्री.भंडारी म्हणाले, राज्यात १४ ठिकाणी उद्योग भवनाची निर्मिती करण्यात येणार आहे. लॉजिस्टीक पार्क स्थापनेसह पाच ठिकाणी स्कील डेव्हलपमेंट सेंटर स्थापन करण्यात येणार आहे.
राज्य सरकारने उद्योग क्षेत्राच्या विकासासाठी घेतेलेले निर्णय, राबविण्यात आलेल्या योजना, राज्यात आलेले नवीन प्रकल्प, तेथे झालेली विदेशी गुंतवणूक, रोजगारनिर्मिती आणि या माध्यमातून औद्यागिक क्षेत्रात घेतलेली उत्तुंग भरारी याची माहिती यावेळी देण्यात आली.
उद्योग सहसंचालक शैलेश राजपूत यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील उद्योजक मोठया संख्येने उपस्थित होते.