शबनम न्युज | मुंबई
महाराष्ट्र हे देशात प्रत्येक क्षेत्रात पुढाकार घेवून आपला ठसा उमटविणारे राज्य आहे. कृषी क्षेत्रातही राज्याची भरारी वाखणण्याजोगी आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जात असताना सगळीकडे शेतकरी आधुनिक पीक पद्धतीचा अवलंब करीत असल्याचे प्रकर्षाने दिसले. उत्पादन वाढीसाठी बळीराजा करीत असलेले कार्य कौतुकास्पद आहे, असे गौरवोद्गार राज्यपाल सी. पी. राधाकृष्ण यांनी काढले. यावेळी त्यांनी पुरस्कार विजेत्या शेतकरी बांधवांचे अभिनंदन केले.
कृषी विभागाच्यावतीने देण्यात येणाऱ्या सन 2020, 2021 व 2022 या तीन वर्षाचे सत्कार व पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन वरळी येथील एन. एस. सी. आय डोम येथे करण्यात आले. त्यावेळी राज्यपाल श्री. राधाकृष्णन उपस्थितांना मार्गदर्शन करताना बोलत होते. कार्यक्रमास व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे, आमदार विक्रम काळे, कृषी विभागाच्या सचिव जयश्री भोज, कृषी आयुक्त रवींद्र बिनवडे, फलोत्पादन विभागाचे संचालक कैलास मोते उपस्थित होते.
राज्यपाल राधाकृष्ण म्हणाले, राज्याची एक रुपयात पीक विमा योजना ही देशात एकमेव आहे. या योजनेचा अन्य राज्य अंगीकार करत आहे. राज्यात कृषी क्षेत्रात अनुदान योग्य मार्गाने दिले जात आहे. शेततळ्याकरीता अनुदान देण्यात येत असल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणावर शेततळे घेवून शेतीला संरक्षित सिंचन उपलब्ध करत आहे. ठिबक सिंचन अनुदान ही राज्याची एक मोठी योजना आहे, यामुळे प्रत्येक थेंबाचा उपयोग उत्पादन वाढीसाठी होत आहे.
महाराष्ट्र राज्य कापूस, सोयाबीन, केळी व द्राक्ष उत्पादनात देशात अव्वल आहे. राज्यातील बळीराजाची मेहनत व आधुनिक तंत्रज्ञानाचा होत असलेला अंगीकार यामुळे महाराष्ट्र हे देशात कृषी क्षेत्रातील अग्रगण्य राज्य बनले आहे, असेही राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी सांगितले. पुरस्कार वितरणावेळी शेतकरी माझ्यासोबत छायाचित्र काढत नाही, तर मीच शेतकऱ्यांसोबत छायाचित्र काढणार आहे, असे बोलून राज्यपाल श्री. राधाकृष्णन यांनी बळीराजाच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाला राज्यभरातून आलेले शेतकरी बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार संचालक (कृषी व विस्तार) विनयकुमार आवटे यांनी मानले.