पिंपरी (दिनांक : ०१ ऑक्टोबर २०२४) राज्यस्तरीय पै स्पेस मॅनिया या स्पर्धेत बीना इंग्लिश मीडियम स्कूल, पांढारकरनगर, आकुर्डी या शाळेतील हेबा अकमल खान या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक पटकावला. पुणे कॅम्प येथील आझम कॅम्पस या संस्थेत सोमवार, दिनांक ३० सप्टेंबर २०२४ रोजी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील ४२ शाळांमधून सुमारे १५०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता; तसेच १०६६ प्रकल्प पाठविले होते. आझम कॅम्पस या संस्थेचे डायरेक्टर डॉ. पी. ए. इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि विजनरी लीडर डायरेक्टर ऑफ रोबोटिक्स इंडियाच्या पायल राजपाल यांच्या हस्ते सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र प्रदान करून हेबा अकमल खानला सन्मानित करण्यात आले. हेबा खानसह बीना इंग्लिश मीडियम स्कूलमधील शाजेब शेख, हसनैन सय्यद, वैभव कांबळे या विद्यार्थ्यांनीही या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
हेबा खानच्या या यशाप्रीत्यर्थ बीना एज्युकेशनल सोसायटी या संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष इक्बाल खान, कोषाध्यक्ष हमजा खान, सरचिटणीस आजम खान, सचिव अकमल खान, विश्वस्त मतलूब उस्मानी, अब्दूल्लाह खान तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका समिना मोमीन, उपमुख्याध्यापिका हेरा खान आदी मान्यवरांनी तिचे अभिनंदन करून उज्ज्वल भवितव्यासाठी शुभेच्छा दिल्या.