शबनम न्यूज | मुंबई
केंद्र व राज्य सरकार हे समाजातील वंचित, गरीब घटकांसाठी अनेक योजना राबवित असते. सरकार बरोबरच अनेक उद्योग, संस्था व कंपन्या या सामाजिक उत्तरदायित्व निधीच्या माध्यमातून या घटकांच्या उन्नती साठी काम करत आहे. वंचित घटकांसाठीची ही सेवा निरंतर सुरू रहावी, असे प्रतिपादन लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी आज येथे केले.
मुंबईतील जिओ सेंटर येथे आयोजित सीएसआर जर्नल एक्सलन्स अवॉर्ड कार्यक्रमात लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते विविध पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे, आयओसीच्या अध्यक्ष पीटी उषा, सीएसआर जर्नलचे मुख्य संपादक अमित उपाध्याय, माजी खासदार गोपाळ शेट्टी, राहुल शेवाळे आदी उपस्थित होते.
समाजातील वंचित, गरिबांच्या उन्नतीसाठी काम करणाऱ्याना या पुरस्काराच्या निमित्ताने एकत्र आणण्याचे काम कौतुकास्पद असल्याचे सांगून श्री. बिर्ला म्हणाले की, समाजाप्रति उत्तरदायित्व निभावत गरिबांसाठी काम करणे ही भारताची संस्कृती, सामर्थ्य आहे. कोविड काळात आपली ही सामूहिक मदत करण्याची संस्कृती जगासमोर आली. अशाच प्रकारे पुढील काळातही सर्वांनी मिळून समाजातील वंचितांना आधार देऊया.
सीएसआर च्या माध्यमातून समाजातील गरीब घटकापर्यंत विकास पोचविण्याचे काम अनेक उद्योग, कंपन्या करत आहेत. याद्वारे समाजाला दिशा देण्याचे काम होत आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पुरस्कारार्थीचा गौरव करण्यात आला.