पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश
शबनम न्युज | पिंपरी
शहरातील रस्त्यावर खड्डेच खड्डे असून दुरवस्था कायम आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडत असल्याने शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी तीव्र शब्दात अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. मुख्य चौकासह शहरातील सर्व रस्त्यावरील खड्डे तत्काळ बुजवावेत. कोणत्याही परिस्थितीत वाहतुकीला अडथळा निर्माण झाला नाही पाहिजे. रस्ते सफाई करत असताना उडत असलेल्या धुळीमुळे नागरिकांना त्रास होत असून त्यावर उपाययोजना कराव्यात. शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देशही खासदार बारणे यांनी दिले.
पिंपरी-चिंचवड शहरातील रस्त्यावरील खड्डे, त्यामुळे होत असलेल्या वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडवण्यासाठी खासदार बारणे यांनी मंगळवारी महापालिका अधिका-यांची बैठक घेतली. महापालिका आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, माजी नगरसेवक निलेश बारणे, प्रमोद कुटे, शिवसेना शहरप्रमुख निलेश तरस, युवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र तरस, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य अभियंता प्रमोद ओंभासे, संजय कुलकर्णी, उपायुक्त मनोज लोणकर, सहायक आयुक्त अजिंक्य येळे, सह शहर अभियंता बाबासाहेब गलबले, सह शहर अभियंता सूर्यवंशी अजय, कार्यकारी अभियंता प्रेरणा शिणकर, देवन्ना गट्टूवार, क्षेत्रीय अधिकारी किशोर ननावरे उपस्थित होते.
खासदार बारणे म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून शहरातील सर्वच भागातील प्रमुख रस्त्यावर वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त आहेत. रस्त्यावरील खड्डे हे वाहतूक कोंडी होण्याचे मुख्य कारण आहे. खड्ड्यामुळे वाहनांचा वेग संथ होत आहे. आता पावसाळा संपला असून रस्ते तत्काळ खड्डेमुक्त करावेत. डांगे चौकात मोठी वाहतूक कोंडी होते. हिंजवडी आयटी पार्कला जाणारे कर्मचारी डांगे चौकातून जातात. कर्मचाऱ्यांचा वाहतूक कोंडीत मोठा वेळ जातो. त्यामुळे त्यांच्या कामावर मोठा परिणाम होतो. त्यासाठी येथील ग्रेडसेपरेटरची लांबी वाढवावी. त्यासाठीची निविदा प्रक्रिया तत्काळ राबवावी.
चिंचवडमधील पुलाचे आयुर्मान संपल्याचे रेल्वे विभागाने जाहीर केले आहे. त्यासाठी महापालिकेने तेथे सुरक्षा कठडे लावले आहेत. या पुलाच्या कामासाठीची निविदा प्रक्रिया राबविण्याची कार्यवाही सुरू करावी. निविदा प्रक्रिया पूर्ण झालेल्या ताथवडे, पुनावळे, रावेत, वाकड भागातील रस्त्यांची कामे सुरू करावीत. देहूरोड कॅन्टोन्मेंटलगतच्या महापालिका हद्दीतील किवळे, रावेत भागातील रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. नवीन रस्ते करावेत. स्मशानभूमीचे काम सुरू करावे. शहरातील उद्यानांची दुरवस्था झाली आहे. थेरगाव येथील बोट क्लबची दुरुस्ती करावी. साफसफाई नियमित करावी. शहरात खासदार, आमदार निधीतून ठिकठिकाणी ओपन जिम सुरू केल्या आहेत. तेथील साहित्याची मोडतोड झाली आहे. त्याची दुरुस्ती करावी अशी सूचनाही खासदार बारणे यांनी केली.
पाणीपुरवठा सुरळीत करा
शहरातील विविध भागातून अपुरा, कमी दाबाने, पाणीपुरवठा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. त्यामुळे नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करावा. नवरात्र उत्सव सुरू होत आहे. त्यानंतर दिवाळीचा मोठा सण आहे. त्यामुळे सणासुदीच्या काळात पाणीपुरवठा विस्कळीत होता कामा नये असे निर्देश खासदार बारणे यांनी अधिकाऱ्यांना दिले.
पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करा
बोपखेल व खडकीला जोडणाऱ्या मुळा नदीवरील पुलाची शिल्लक किरकोळ कामे तत्काळ पूर्ण करावीत. यासह शहरातील पूर्ण झालेल्या विकास कामांचे लोकार्पण करण्याचे नियोजन करण्याची सूचनाही खासदार बारणे यांनी केली.