शबनम न्युज | पुणे
उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सुभाष बांठिया यांचा अमृतमहोत्सव नुकताच साजरा झाला. वर्धमान प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास राठोड यांच्या पुढाकारातून आयोजित कार्यक्रमात बांठिया यांना माजी महापौर दत्ताजी गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते वालचंद संचेती यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, मानपत्र, शाल, पुणेरी पगडी देऊन सन्मानित करण्यात आले. सेनापती बापट रस्त्यावरील आरसी जैन स्थानकात झालेल्या सोहळ्यात ज्येष्ठ नेते अभय छाजेड, कवी द्वारका जालान यांच्यासह इतर अनेक मान्यवर उपस्थित होते.
व्हॅल्युअर व सल्लागार म्हणून बांठिया गेल्या पाच दशकाहून अधिक काळ काम करत आहेत. परफेक्ट व्हॅल्युएशन अँड कंसल्टंट्सचे बांठिया संस्थापक आहेत. नुकत्याच झालेल्या ग्लोबल व्हॅल्युएशन समिटमध्ये त्यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. न्यू इंग्लिश स्कुलमधून शालेय शिक्षण घेतल्यानंतर फर्ग्युसन महाविद्यालय, एनआयटी सुरत येथून इंजिनिअरिंग व इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट बंगळुरू येथून त्यांनी एमबीएचे शिक्षण घेतलेले आहे. व्यवस्थापन, अभियांत्रिकी, संपत्ती मूल्यांकन क्षेत्रात त्यांनी भरीव योगदान दिले आहे.
वयाच्या पंच्याहत्तरीतही बांठिया यांनी अतिथंड असलेल्या अंटार्टिका व दक्षिण ध्रुवाचा प्रवास, विविध मॅरेथॉन, ट्रेकिंग, सुरत ते कन्याकुमारी असा सायकल प्रवास अनेकांसाठी प्रेरक असल्याचा गौरवपूर्ण उल्लेख मान्यवरांनी केला. आपल्या ज्ञानाचा उपयोग देशकार्यासाठी व्हावा, त्यातून आपली प्रगती व्हावी, या उद्देशाने आजवर काम करत आलो आहे. यामध्ये माझ्या कुटुंबियांचेही योगदान मोलाचे आहे. आज या कार्याचा गौरव झाला, याचा मनस्वी आनंद आहे, अशी भावना बांठिया यांनी व्यक्त केली.