पुणे : नवरात्रौत सलग 10 दिवस चालू असणारा ‘पुणे नवरात्रौ महोत्सव’ हा सांस्कृतिक महोत्सव यंदा दिमाखदार 30वे वर्ष साजरे करीत आहे. घटस्थापनेच्या दिवशी गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 4:30 वाजता अखिल भारतीय कॉंग्रेस महासमितीचे सरचिटणीस रमेश चेन्निथला आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते श्री गणेश कला क्रीडा रंगमंच, स्वारगेट, पुणे येथे याचे शानदार उद्घाटन संपन्न होईल.
सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड आणि नृत्य दिग्दर्शिका निकिता मोघे, फुलवंती चित्रपटातील नायिका प्राजक्ता माळी यांची उद्घाटन सोहळ्यातील उपस्थिती लक्ष्यवेधी असेल.
शिवदर्शन येथील दाक्षिणात्य धाटणीच्या श्री लक्ष्मीमाता मंदिरात गुरुवार, दि. 3 ऑक्टोबर रोजी सकाळी 6 वाजून 5 मिनिटांच्या शुभमुहूर्तावर सौ. जयश्री बागुल व श्री आबा बागुल यांच्या शुभहस्ते विधिवत घटस्थापना संपन्न होईल.
उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री मा. डॉ. विश्वजीत कदम, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, प्रसिद्ध उद्योजक व बालन ग्रुपचे अध्यक्ष पुनीत बालन, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत व माजी आमदार उल्हास पवार, आमदार रवींद्र धंगेकर, आमदार माधुरी मिसाळ, आमदार संग्राम थोपटे, माजी आमदार मोहन जोशी, आमदार संजय जगताप, अध्यक्ष, पुणे शहर काँग्रेस अरविंद शिंदे, माजी गृहराज्य मंत्री रमेश बागवे, माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार दिप्ती चवधरी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस अभय छाजेड, शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, पुणे शहर प्रशांत जगताप, शहर प्रमुख, शिवसेना उबाठा पक्ष संजय मोरे, अध्यक्ष, एनएसयूआय महाराष्ट्र प्र. काँग्रेस अमिर शेख, अध्यक्षा, पुणे शहर महिला काँग्रेस पूजा आनंद, माजी महापौर कमल व्यवहारे, डायरेक्टर सुहाना-प्रविण मसालेवाले विशाल चोरडिया, पुणे मनपा आयुक्त राजेंद्र भोसले, पुणे शहर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची उपस्थिती उद्घाटन सोहळ्यात असणार आहे.
विविध क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्यांना दरवर्षी उद्घाटन सोहळ्यात ‘श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरविले जाते. यंदा राजीव खांडेकर (ज्येष्ठ संपादक), ॲड. वंदना चव्हाण (माजी खासदार, पर्यावरणवादी), नितीन बानगुडे-पाटील (प्रसिद्ध व्याख्याते), डॉ. संजीव चौधरी (ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व ऑर्थोपेडिक सर्जन), आनंदी विकास (ज्येष्ठ संगीतकार व गायिका), हिंदवी पाटील (लावणी लोककलावंत) यांना उद्घाटन सोहळ्यात श्री लक्ष्मीमाता जीवन गौरव पुरस्काराने गौरविले जाणार आहे.
उद्घाटन सोहळ्याचा प्रारंभ सनईच्या मंजुळ सुरांनी होणार असून दीपप्रज्वलनाने 30व्या महोत्सवाचे उद्घाटन झाल्यानंतर देवीची सामूहिक आरती होईल.
उद्घाटन सोहळ्याची सुरुवात कथक नृत्यांगना शर्वरी जमेनिस यांच्या ‘दुर्गा नमनाने’ होईल. त्यानंतर स्वाती धोकटे आणि विनोद धोकटे ‘देवीचा जागर व गोंधळ’ सादर करणार आहेत.
‘नृत्यरंग’ कार्यक्रमाअंतर्गत सिनेतारकांचा नृत्याविष्कार व बॉलीवुड धमाका या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. नृत्यदिग्दर्शन निकिता मोघे यांचे आहे. सुप्रसिद्ध सिनेतारका रुपाली भोसले, भार्गवी चिरमुले, मधुरा कुलकर्णी, आलापिनी निसाळ, अमृता धोंगडे, मीरा जोशी, वैष्णवी पाटील, पूनम घाडगे, आदिती द्रविड यांचा नृत्याविष्कार सादर होणार आहे. उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन शिल्पा देशपांडे करणार आहेत.
‘पुणे नवरात्रौ महोत्सवा’चा श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथील उद्घाटन सोहळा व सर्व रोजचे सांस्कृतिक कार्यक्रम यांचे थेट प्रक्षेपण पुण्यात आयसीसी केबल नेटवर्क, जीटीपीएल केबल नेटवर्क, नेक्स्ट जनरेशन केबल नेटवर्क आणि एससीसी केबल नेटवर्क वरून केले जाणार आहे.
उद्घाटनानंतर सायंकाळी 7 वाजता ‘परंपरा’ कार्यक्रमाअंतर्गत भारतरत्न स्वरभास्कर पंडित भीमसेन जोशी, श्रीनिवास जोशी ते विराज जोशी यांचा सांगीतिक प्रवास उलगडला जाणार असून श्रीनिवास जोशी व विराज जोशी यांचे कार्यक्रमात सादरीकरण होणार आहे. अशी माहिती पुणे नवरात्रो महोत्सवाचे आयोजक अध्यक्ष आबा बागुल यांनी दिली.