पुणे: येथील एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नोलॉजी विद्यापीठात उद्या, मंगळवार, ३ ऑक्टोबर २०२४ रोजी बहुप्रतीक्षित भारत-जपान फ्युजन फॅशन शोचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात भारतीय आणि जपानी परिधान परंपरेचा संमिश्र प्रदर्शन होणार आहे. कार्यक्रमाचा विषय “आपली सांस्कृतीक परंपरा जपा, शान वाढवा” असा ठेवण्यात आला आहे, ज्यामध्ये पारंपरिक भारतीय साडी आणि जपानी किमोनो यांचा समन्वयाने आधुनिक वेगळेपणा जपणाऱ्या फॅशनेबल कपड्यांचे प्रदर्शन दाखविले जाणार आहे.
पुण्यात अशाप्रकारच्या शोचे एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदा आयोजन होत असून त्यातून विद्यार्थ्यांसह नागरिकांना भारतीय-जपानी वस्त्रकलेचा एक वेगळा अविष्कार पाहावयास मिळणार आहे. फॅशन शोमध्ये जपानी डिझायनर काजुको बारिसिक यांनी तयार केलेल्या खास संग्रहाचे सादरीकरण होणार आहे. या संग्रहात पुनर्नवीनीकृत किमोनो कापडांचा भारतीय डिझाइनसोबत असलेला संगम पाहायला मिळेल. याशिवाय, भारत-जपान संबंध तज्ञ टोमियो इसोगाई हे जपानमधील करिअर संधींबाबत मास्टरक्लास आयोजित करतील. या कार्यक्रमामुळे सांस्कृतिक आणि शैक्षणिक दृष्टिकोनातून देखील विद्यार्थ्यांना समृद्ध अनुभव मिळणार आहे.