शबनम न्युज | पुणे
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाच्यावतीने ६५ वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मुख्यमंत्री वयोश्री योजनेअंतर्गत विविध साधने खरेदी करण्यासाठी निधी वितरण करण्यात येत असून लाभार्थ्यांनी ४ ऑक्टोबर २०२४ पर्यंत ऑफलाईन अर्ज सहायक आयुक्त, समाज कल्याण, पुणे यांच्या कार्यालयास सादर करावेत, असे आवाहन वयोश्री योजनेचे सदस्य सचिव तथा समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त विशाल लोंढे योनी केले आहे.
पात्र वृध्द लाभार्थ्यांना त्यांच्या शारिरीक असमर्थता, दुर्बलतेनुसार चष्मा, श्रवणयंत्र ट्रायपॉड, स्टिक व्हील चेअर, फोल्डिंग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी सहायभूत आवश्यक सहाय साधने, उपकरणे खरेदी करण्यासाठी तसेच मनःस्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादी द्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी या योजनेअंतर्गत लाभ दिले जातात.
या योजनेच्या अंमलबजावणीसाठी नवीन स्वतंत्र पोर्टल कार्यान्वित होईपर्यंत या योजनेअंतर्गत निधीचे वितरण पात्र लाभार्थ्याच्या वैयक्तिक आधार संलग्न बॅकेच्या बचत खात्यात एकवेळ ऑनलाईन पध्दतीने करण्याऐवजी निधीचे वितरण पात्र लाभार्थ्यांना थेट धनादेशाव्दारे एकवेळ एकरकमी ३ हजार रूपयेच्या मर्यादेत ऑफलाईन पध्दतीने वितरीत करण्यास शासनाने मान्यता प्रदान केलेली आहे, असेही प्रसिद्धी पत्रकान्वये कळविण्यात आले आहे.