अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांचे स्त्री शक्तीला आवाहन
पुणे नवरात्र महोत्सवात तेजस्विनी पुरस्कारांचे वितरण आणि आदर्श मातांचा सन्मान
पुणे – ‘नवरात्रीचा उत्सव म्हणजे स्त्री शक्तीचे पूजन करण्याचा उत्सव, मात्र सध्या समाजात सातत्याने घडणार्या स्त्री अत्याचाराच्या घटना पाहता, स्त्रियांनी पुढाकार घेत, एकत्रित येऊन स्त्री मधील शक्तीचे जागरण केले पाहिजे. स्त्री ही कोमल असेल, पण ती कमजोर अजिबात नाही, हे ठामपणाने सांगितले पाहिजे’, असे आवाहन अखिल भारतीय महिला कॉंग्रेस पक्षाच्या अध्यक्षा अलका लांबा यांनी शुक्रवारी येथे केले. व्यासपीठावरील औपचारिकता सोडून देत, अलका लांबा उपस्थित महिलांमध्ये मोकळेपणाने मिसळल्या. त्यांनी अनेक महिलांशी संवाद साधला. सेल्फी काढल्या. गाणे म्हटले आणि महिलांनीही कोरस देत, त्यांना प्रतिसाद दिला. मराठमोळा फेटा बांधून आणि नथ घालून लांबा यांनी महिलांशी कनेक्ट होण्याचा प्रयत्न केला.
पुण्याची गौरवशाली ओळख असलेल्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवात शुक्रवारी दुपारी लांबा यांच्या हस्ते २५ व्या महिला महोत्सवाचे श्री लक्ष्मीमाता मंदिर प्रांगण, शिवदर्शन, पुणे येथे उद्घाटन झाले. महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा संध्या सव्वालाखे याप्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. याप्रसंगी पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल, पुणे नवरात्रौ महोत्सवाचे अध्यक्ष आबा बागुल, महाराष्ट्र प्रदेश महिला कॉंग्रेस सरचिटणीस संगीता तिवारी, महिला कॉंग्रेसच्या सुनीता गवांडे , पुणे शहर महिला कॉंग्रेस अध्यक्ष पूजा आनंद, व्यासपीठावर उपस्थित होत्या.
अलका लांबा पुढे म्हणाल्या, ‘देशाच्या लोकसंख्येपैकी निम्मी संख्या आपली आहे. आपणच आपल्या संरक्षणासाठी, प्रगतीसाठी कटिबद्ध असले पाहिजे. घटनेने आपल्याला दिलेले अधिकार आणि हक्क बजावले पाहिजेत. एकमेकींना पाठिंबा देत, एकत्रित प्रयत्नाने समाजात पुढे आले पाहिजे. नवरात्र महोत्सवात शक्तीचे, देवीचे पूजन करणार्या पुरुषांनी आधी घराघरातील शक्तीरूपे समजून घेतली पाहिजेत. घरातील स्त्रीचे हक्क, अधिकारांची जाणीव ठेवली पाहिजे. बदलांची सुरवात घरापासून केली पाहिजे. स्त्रीचे शांत राहणे, म्हणजे तिचा दुबळेपणा नाही. स्त्री कोमल असेल पण ती कधीच कमजोर नाही, हे लक्षात ठेवले पाहिजे’. आपल्या मोबाईलवर ‘कोमल है कमजोर नही तू’ हे प्रसिद्ध गीत लांबा यांनी सिलेक्ट केले आणि ते ध्वनिक्षेपकावरून सर्वांना ऐकवले. स्वतःही गात गात, त्या व्यासपीठावरून खाली उतरल्या आणि उपस्थित महिलांमध्ये मिसळल्या.
याप्रसंगी कर्तबगार महिलांना दिला जाणारा ‘तेजस्विनी’ पुरस्कार सामाजिक कार्याबद्दल सोहम संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मनिषा सोनवणे, आपत्ती व्यवस्थापक सुषमा खटावकर आणि क्रीडापटू मधुरा धामणगावकर यांना लांबा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच खडतर परिस्थितीत आपल्या मुलांना उत्तम शिकवणूक, विचार देऊन आदर्श नागरिक घडविणाऱ्या सुमारे ४०० अधिक महिलांचा आदर्श माता पुरस्काराने गौरव करण्यात आला.
प्रास्ताविक करताना जयश्री बागुल म्हणाल्या, ‘महिलांना हक्काचे व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा या हेतूने सुरु झालेल्या या महिला महोत्सवाचे यंदा २५ वे वर्ष आहे. दरवर्षी हजारो महिला या महोत्सवात सहभागी होतात. महिलांसाठी अनेक स्पर्धा घेतल्या जातात. उत्तम टीमवर्कमुळेच हा उपक्रम इतकी वर्षे सातत्याने शक्य होत आहे’.
आबा बागुल म्हणाले, ‘स्त्रीशक्तीच्या विविध रूपांचे दर्शन या महिला महोत्सवात घडते. आपल्या कर्तृत्वाने समाजासाठी योगदान देणार्या तसेच मातृशक्तीला वंदन करण्याच्या हेतूने हा महिला उत्सव साजरा केला जातो’.
प्रारंभी शिवांजली नृत्य अकादमीच्या विद्यार्थिनींनी गणेशवंदना सादर केली. रत्नाकर शेळके डान्स अकॅडमी च्या विद्यार्थिनींनी सादरीकरण केले. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलन तसेच देवीची आरती करण्यात आली. रत्ना दहिवेलकर यांनी सूत्रसंचालन केले. याप्रसंगी योगिता नकम, प्रांजली गांधी, निर्मला जगताप, विद्युलता साळी उपस्थित होत्या.
फोटो ओळ – १. पुणे नवरात्रौ महोत्सवा अंतर्गत २५ व्या पुणे नवरात्रौ महिला महोत्सवाचे उद्घाटन अ. भा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा अलका लांबा यांच्या हस्ते झाले याप्रसंगी डावीकडून आबा बागुल, डॉ. मनीषा सोनावणे, अलका लांबा, सुषमा खटावकर, मधुरा धामणगावकर, संध्या सव्वालाखे, जयश्री बागुल, निर्मला जगताप, संगीता तिवारी, पूजा आनंद, प्रांजली गांधी उपस्थित होत्या.
२. या कार्यक्रमात आबा बागुल सौ. जयश्री बागुल, अलका लांबा, संध्या सव्वालाखे, संगीता तिवारी, सुनिता गवांडे, पूजा आनंद, तेजस्विनी पुरस्काराने सन्मानित महिला यांच्या समवेत ४०० हुन अधिक आदर्श माता यांना फेटा बांधून त्यांचा सत्कार केला गेला.