पिंपरी :- महापालिकेच्या विविध सेवा सुविधा तसेच कामकाजाबाबत नागरिक प्रत्यक्ष कार्यालयात येऊन अथवा विविध पोर्टलद्वारे तक्रारी नोंदवित असतात. त्याकडे प्राध्यान्याने लक्ष देऊन या तक्रारींचा निपटारा वेळेत करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी नियोजन करून कार्यवाही करण्याचे निर्देश आयुक्त शेखर सिंह यांनी दिले.
महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या विविध सेवा सुविधा आणि कामकाजाबाबत नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा विभागनिहाय सर्वंकष आढावा आयुक्त शेखर सिंह यांनी घेतला त्यावेळी सबंधित अधिकाऱ्यांना त्यांनी याबाबत सूचना केल्या.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनामध्ये झालेल्या आढावा बैठकीमध्ये अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, चंद्रकांत इंदलकर, शहर अभियंता मकरंद निकम, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण, मुख्य अभियंता संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी तथा वित्त संचालक प्रविण जैन, मुख्य लेखापरिक्षक प्रमोद भोसले, नागरी सुविधा केंद्राचे उपआयुक्त राजेश आगळे यांच्यासह सहशहर अभियंता, उप आयुक्त सहाय्यक आयुक्त, क्षेत्रीय अधिकारी तसेच विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
महापालिकेच्या वतीने दिल्या जाणाऱ्या सेवा आणि कामकाजाबाबतच्या नागरिकांच्या तक्रारी आपले सरकार, सारथी अॅप, पी.जी. पोर्टल, सी.एम.ओ. पोर्टल आदी माध्यमांद्वारे महापालिकेकडे प्राप्त होत असतात. तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यावर आवश्यक कार्यवाही करून सबंधित विभागाद्वारे तक्रारींचे विहित वेळेत निराकरण करावे, यासाठी सर्वांनी योग्य समन्वय ठेवून सुक्ष्म नियोजन करावे आदी सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.