पंतप्रधान नरेंद्र मोदी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्रीमंडळाचे मानले आभार
शबनम न्युज | पिंपरी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची काल (गुरुवारी) महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा महत्वपूर्ण आणि ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.
या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत करण्यासाठी पिंपरी चिंचवड भाजपचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोरवाडी येथील भारतीय जनता पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाजवळ एकत्रित येत मिठाई वाटून आनंदोत्सव साजरा केला. यावेळी पदाधिकाऱ्यांनी ‘मी मराठी, आम्ही मराठी’, अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला.
याप्रसंगी माजी सत्तारूढ पक्षनेते नामदेव ढाके, सरचिटणीस संजय मंगोडेकर, रवी देशपांडे, प्रदीप बोन्द्रे, मंडलाध्यक्ष राजेंद्र बाबर, सोमनाथ भोंडवे, योगेश चिंचवडे, भगवान निकम, प्रसन्न अष्टेकर, विजय शिनकर, कोमल शिंदे, ऍड. दत्ता झुळूक, महेंद्र बाविस्कर, महेश बालकवडे, राकेश नायर, मंडलाध्यक्षा पियुषा पाटील, दीपक भंडारी, जनार्धन तालेरे, निलेश जगताप, सचिन बंडी, दीपाली बेलसरे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना नामदेव ढाके म्हणाले की, या ऐतिहासिक निर्णयाचे खरे श्रेय महाराष्ट्रातील संत परंपरेला आहे. ज्यांनी आपल्या ग्रंथ, पोथी, ओव्या आणि वाड्मयाद्वारे रचलेल्या “माझा मराठाचि बोलु कौतुके। परि अमृताते ही पैजा जिंके।” या शब्दांमधून मराठी भाषेविषयी असलेले प्रेम आणि अभिमान प्रत्येक मराठी जनांमध्ये रुजविला. त्यांच्या या योगदानामुळेच आज आम्हाला या ऐतिहासिक दिवसाचा साक्षीदार होता आले. हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे मनापासून आभार.
महाराष्ट्रासाठी आणि मराठी भाषाप्रेमींसाठी हा ऐतिहासिक सोनेरी दिन - शंकर जगताप
आपल्या माय मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला हा आजचा दिवस "लाभले आम्हास भाग्य; बोलतो मराठी" असं अभिमानाने म्हणणाऱ्या जगभरातील प्रत्येक मराठी भाषिकांसाठी ऐतिहासिक आणि सुवर्णाक्षरात लिहिला जावा असा दिवस आहे. हा निर्णय घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या शिष्टमंडळाचे तसेच गेल्या अनेक वर्षांपासून यासाठी संघर्ष करणाऱ्या आणि सातत्याने पाठपुरावा, प्रयत्न करणाऱ्या सर्वांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो.
महाराष्ट्राची मान उंचविणारा असा हा आजचा ऐतिहासिक दिवस आहे. या ऐतिहासिक दिवसांसाठी महाराष्ट्रातील अनेक थोर साहित्यिक, विचारवंत, अभ्यासक, समीक्षक यांनी कित्येक वर्षे संघर्ष केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा केला होता. अखेर आज महायुती सरकारच्या माध्यमातून या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. आणि हा सोनियाचा दिनू तमाम मराठी भाषिकांना पाहायला मिळाला आहे.
श्री. शंकर जगताप
शहराध्यक्ष - भारतीय जनता पक्ष पिंपरी चिंचवड शहर / जिल्हा