– भामा आसखेडमधून २०० एमएलडी पाणी उपलब्ध होणार
– पिंपरी-चिंचवडमधील पाणी प्रश्न सुटण्यासाठी महत्त्वाकांक्षी प्रकल्प
शबनम न्यूज: प्रतिनिधी
पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहराचा आगामी २५ वर्षांत वाढती लोकसंख्या गृहीत धरुन पाणी पुरवठा सक्षम होईल, असा आंद्रा, भामा आसखेड प्रकल्प प्रगतीपथावर आहे. या प्रकल्पातील आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाणी चिखली येथील जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करुन वितरीत केले जात आहे. आता भामा आसखेड धरुणातून १६८ एमएलडी उपलब्ध करण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण प्रकल्पाच्या फेज-२ चे कामाचा ‘‘श्रीगणेशा’’ करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी जलवाहिनीचे काम अंतिम टप्प्यात असून, आगामी जून- २०२५ पर्यंत शहराला मिळेल, असे नियोजन महानगरपालिका प्रशासनाने केले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज या प्रकल्पाचे ऑनलाईन भूमिपूजन झाले. यावेळी शहरातील लोकप्रतिनिधी व महापालिका अधिकारी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड नगरपरिषदेची स्थापना १९७० मध्ये झाली. त्यानंतर १९८२ मध्ये महानगरपालिका स्थापना झाली. त्यावेळीपासून शहराला केवळ पवना धरणातून पाणी पुरवठा केला जात होता. २०१३ मध्ये तत्कालीन काँग्रेस आघाडीच्या सरकारने आंद्रा, भामा आसखेड धरणातून २६८ एमएलडी पाणी आरक्षीत केले. मात्र, पाणी पुन:स्थापना खर्च न भरल्यामुळे सदर आरक्षण रद्द झाले होते.
दरम्यान, २०१७ मध्ये पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपाची सत्ता आल्यानंतर आमदार महेश लांडगे यांनी पाठपुरावा सुरू केला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवडला आंद्रा, भामा आसखेडचे पाणी आरक्षीत केले. २०१८ मध्ये सदर प्रकल्पाचे काम सुरू झाले.
प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात आंद्रा धरणातून १०० एमएलडी पाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी चिखली येथे जलशुद्धीकरण केंद्र उभारण्यात आले. दि. १५ मे २०२३ रोजी हा प्रकल्प कार्यान्वयीत झाला. निघोजे- तळवडे येथील जॅकवेलमधून इंद्रायणी नदीतील पाणी उचलले जाते. त्यावर चिखली येथील प्रकल्पामध्ये प्रक्रिया करुन सदर पाणी भोसरी विधानसभा मतदार संघात वितरीत केले जात आहे.
***
दुसऱ्या टप्प्यातील काम प्रगतीपथावर…!
प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये भामा आसखेड धरणातून मंजुर १६८ एमएलडी पाणी जॅकवेलमधून मौजे नवलाख उंब्रे प्रेशर टँकपर्यंत जलवाहिनीद्वारे आणणे. तसेच, त्यानंतर ब्रेक प्रेशर टँकपासून चिखली जलशुद्धीकरण केंद्रात आणणे व त्यावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. दि. १५ मार्च २०२४ रोजी या प्रकल्पाचे काम सुरू झाले आहे. तसेच, भामा आसखेड धरण ते नवलाख उंब्रे येथील बीपीटीपर्यंत (ब्रेक प्रेश टँक) पर्यंत १७०० मि.मी. व्यासाची रायझिंग मेन आणि नवलाख उंब्रे येथील ‘बीपीटी’ ते देहूपर्यंत १४०० मि.मी. व्यासाची ग्रॅव्हीटी मेन टाकण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. काही ठिकाणी भूसंपादनामध्ये अडथळा असून, सदर काम प्राधान्याने पूर्ण करण्याबाबत प्रशासन आगृही आहे. महाराष्ट्र औद्योगिक महामंडळ टप्पा दोन क्षेत्रातील ७५ मी. रुंद रस्त्याच्या जागेसाठी भूसंपादनाचा प्रस्ताव एमआयडीसी उपविभागीय अधिकारी, मावळ यांच्याकडे प्रलंबित आहे. सदर प्रस्तावास परवानगी मिळाल्यास महानगरपालिका जलवाहिनी टाकण्याचे काम सुरू करणार आहे.
***
भामा आसखेडमध्ये ‘जॅकवेल’च्या कामाला गती…
भामा आसखेड धरणातून ६०.७९० द.ल.घ.मी. (१६८ एम.एल.डी.) इतक्या बिगर सिंचन पाणी आरक्षण कोट्यास महाराष्ट्र शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस मंजुरी दिलेली आहे. त्या अनुशंगाने महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून मौजे वाकी तर्फे वाडा येथे भामा आसखेड धरणाजवळ अशुद्ध जलउपसा केंद्र बांधणे व त्यासाठी जॅकवेल, पंपहाऊस, ॲप्रोच ब्रीज, इंटेक चॅनेल बांधणे व विद्युत, यांत्रिकी, Instrumentation SCADA सह इतर अनुषंगिक कामे करण्यात येणार आहेत. या कामाला प्रशासनाने गती दिली आहे.
***
प्रतिक्रिया :
शहराची वाढती लोकसंख्या आणि पाण्याची मागणी याचा विचार करता आंद्रा, भामा आसखेड हा प्रकल्प पिंपरी-चिंचवडसाठी ‘जलसंजीवनी’ ठरणार आहे. प्रकल्पाचे पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून, उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. दुसऱ्या टप्प्यातील २०० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पाचे कामाचे भूमिपूजन होत आहे. आगामी जून- २०२५ पर्यंत पूर्ण होईल, असा विश्वास आहे. समाविष्ट गावांतील पाणी समस्या सोडवण्यास मदत झाली झाली असून, नागरिकांना दिलेला शब्द पूर्ण होत असल्याचे समाधान आहे.
– महेश लांडगे, आमदार, भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.