शबनम न्युज | पुणे
इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशनच्या (आयपीए) वतीने हैद्राबाद येथे नुकत्याच झालेल्या ७३ व्या इंडियन फार्मास्युटिकल काँग्रेसमध्ये सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशन संचालित सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी हेल्थकेअर अँड रिसर्चने (एससीपीएचआर) शानदार प्रदर्शन केले. औषधनिर्माण क्षेत्रातील करिअर आणि फार्मास्युटिकल सायन्सला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या परिषदेचे आयोजन केले होते. ‘जागतिक कल्याणासाठी भारतीय औषधनिर्माण उद्योगाची भूमिका’ अशी या परिषदेची मध्यवर्ती संकल्पना होती. ‘सूर्यदत्त’ने या परिषदेत सहप्रायोजक म्हणूनही योगदान दिले.
या परिषदेमध्ये ७५ सत्रामध्ये औषधनिर्माण शास्त्र व प्रोफेशन यावर विविध तज्ज्ञांकडून चर्चा झाली. तेलंगणाचे उपमुख्यमंत्री भट्टी विक्रमार्का आणि माहिती तंत्रज्ञान व उद्योग-वाणिज्य मंत्री डी. श्रीधर बाबू यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन झाले. फार्मास्युटिकल कंपन्या आणि शिक्षण संस्थांमधील सुमारे ८५०० डेलिगेट्स यामध्ये उपस्थित होते. इंडस्ट्री आणि अकॅडमीच्या लोकांना एकत्रित आणून त्यांच्यात परस्पर सहयोग व समन्वय साधण्याचे हे एक उत्तम व्यासपीठ आहे. सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया व उपाध्यक्षा सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एससीपीएचआर’च्या टीमने या परिषदेत ‘सूर्यदत्त’च्या कार्याचे उत्तम सादरीकरण केले.
‘एससीपीएचआर’च्या अध्यापक वर्गाने या परिषदेत आपले संशोधन प्रदर्शित केले. यासह फार्मसी प्रोफेशनल, उद्योजक व इतर शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी यांच्याशी चर्चा करून विचारांची देवाणघेवाण केली. येथील प्रदर्शनात सहभागी होत फार्मा उद्योग उदयोन्मुख प्रगत तंत्रज्ञान, कौशल्यांची आवश्यकता याविषयी जाणून घेतले. या क्षेत्रासाठी आवश्यक गोष्टींबाबत चर्चा केली. याचा उपयोग त्यांना विद्यार्थ्यांना रोजगाराभिमुख व शाश्वत मनुष्यबळाची निर्मिती करण्यात निश्चितपणे होणार आहे. इंडस्ट्री-इन्स्टिट्यूट संवादांतर्गत उद्योग क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांना विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी निमंत्रित करण्यात आले.
यातील अनेक उद्योगांनी ‘सूर्यदत्त’शी सामंजस्य करार करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे, तसेच मार्गदर्शन व प्लेसमेंट्च्या संधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. ‘सूर्यदत्त’चे सल्लागार प्रसन्न पाटील, प्रा. डॉ. सारिका झांबड यांनी युनिव्हर्सिटी ऑफ ऑस्ट्रेलियाचे डॉ. कार्ल स्केनायडर, अमेरिकेतील आयव्हीएलएन सर्माचे वेंकट यक्कुर्थी, प्रा. डॉ. विजय भल्ला, संयुक्त अरब अमिरातीमधील सेफ्टी फर्स्ट मेडिकल सर्व्हिसेसचे संचालक डॉ. केजी अनिलकुमार, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त आर. पी. चौधरी, हैद्राबाद येथील सेफव्हीजी सोल्युशनच्या संचालक श्रीदिव्या पालाचार्ला, क्युबीडी इंटरनॅशनलचे सीईओ रणजित बार्शीकर, आयपीएचे समन्वयक डॉ. एल. सत्यनारायणन, महाराष्ट्र फार्मसी कौन्सिलचे अतुल अहिरे, रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्रीच्या डॉ. श्वेता राघवन, डॉ. सुनील चिपळूणकर, डॉ. महेश बुरांडे, अनिल नमनधर आदी मान्यवरांशी चर्चा करून सन्मानित केले. तसेच सूर्यदत्तमध्ये येण्यासाठी निमंत्रित केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाची स्वायत्त संस्था ‘आयपीसी’ औषध निर्मिती व विक्री यासाठीची मानके ठरवत असते. या प्रदर्शनात व परिषदेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक मान्यवर सहभागी झाले होते. ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाला प्रोत्साहित करण्यासाठी हा उपक्रम महत्वपूर्ण आहे. अनेक नामवंत कंपन्यांचे, महाविद्यालयांचे प्रमुख पदाधिकारी, प्रतिनिधी यामध्ये सहभागी झाले होते. भविष्यातील विद्यार्थ्याभिमुख उपक्रम राबविण्याच्या दृष्टीने ही परिषद ‘सूर्यदत्त’साठी खूपच उपयुक्त ठरली. विचारांचे आदानप्रदान करण्याची अनोखी संधी ‘सूर्यदत्त’च्या सर्व अध्यापक वर्गाला मिळाली, याचे समाधान आहे.”