शबनम न्युज | पुणे
पुणे म्हाडाचे अध्यक्ष राज्यमंत्री तथा माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या गेली दोन वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून मुख्यमंत्री व परिवहन मंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळातील जुन्नर बस स्थानकाची पुनर्बांधणी करणे या कामासाठी 9 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला.
जुन्नर शहर हे तालुक्यातील प्रमुख शहर असून या शहरातील बसस्थानकाची झालेली दुरावस्था पाहून माजी खासदार शिवाजीराव पाटील यांनी या बसस्थानकाची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला. याकामी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्रव्यवहार करून व त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन कामाचे महत्व पटवून दिले. त्यानुसार महायुती शासनाच्या माध्यमातून या कामाला गृह विभागाने मंजुरी देत 9 कोटी 50 लक्ष निधी मंजूर केला आहे. यामध्ये प्रामुख्याने तळमजला व पहिल्या मजल्याचे बांधकामात फलाट, वाहतुक नियंत्रण कक्ष, रिजव्हेशन, पास सेक्शन, पार्सल ऑफीस, चालक / वाहक विश्रांतीगृह, महीला विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, प्रसाधनगृह इ. विकासात्मक कामाचा समावेश आहे. त्याचबरोबर पाणीपुरवठा व सांडपाणी, काँक्रीट वाहनतळ, विद्युत विषयक कामे, रेन वॉटर हार्वेस्टिंग, फायर फायटिंग, संरक्षक भिंत अशा विविध कामांचा समावेश आहे.
जुन्नर शहरातील विविध विकास कामे प्राधान्याने मंजूर व्हावी यासाठी नेहमीच आग्रही राहिलो असून या कामामुळे जुन्नर शहर विकासात वृद्धी होऊन प्रवाशांना सर्व सोयीयुक्त बसस्थानक उपलब्ध होणार आहे. या कामाची निविदा प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करून काम दर्जेदार व्हावे अशा सूचना महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळास केल्याचे पुणे म्हाडाचे अध्यक्ष, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सांगितले.