शबनम न्यूज | चिंचवड
चिंचवड विधानसभा मतदारसंघातून ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी मंगळवारी (ता. २९) पिंपरी चिंचवड परिवर्तन आघाडीचे उमेदवार म्हणून अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यापूर्वी सोमवारी त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणूनही दोन अर्ज दाखल केले होते, ज्यामुळे त्यांच्या उमेदवारीबाबत मोठी चर्चा झाली आहे.
थेरगाव येथील ग-क्षेत्रीय कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अमोल पवार यांच्याकडे अर्ज सादर करताना भाऊसाहेब भोईर यांचे पुत्र हर्षवर्धन भोईर अधिकृत सूचक म्हणून उपस्थित होते. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अमर जाधव, तौसिफ पिंजारी आणि रवींद्र यंगड यांचीही उपस्थिती होती.
सोमवारी झालेल्या उमेदवारी अर्ज दाखल रॅलीत विविध पक्ष आणि संघटनांचे कार्यकर्ते, स्वयंसेवक आणि मतदार संघातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. जल्लोषपूर्ण वातावरणात नागरिकांनी भोईर यांच्या पाठींब्यासाठी घोषणा दिल्या. परंतु मंगळवारी परिवर्तन आघाडीचा अर्ज साध्या आणि शांत पद्धतीने दाखल करण्यात आला, ज्याची परिसरातील नागरिकांनी प्रशंसा केली.
भाऊसाहेब भोईर म्हणाले, “चिंचवड मतदारसंघ हा आता विविध प्रांतांतील आणि सर्व धर्मांतील लोकांचे राहण्याचे ठिकाण बनले आहे. सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज सादर केल्यावर मंगळवारी परिवर्तन आघाडीकडूनही अर्ज दाखल केला. छाननीनंतर मी अधिकृत उमेदवार म्हणून निवडणुकीत असेन.”