शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी,: पिंपरी,चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढावे यासाठी “भव्य मतदार जनजागृती बाईक रॅलीचे” आयोजन करून लोकचळवळ उभी करण्यात येणार आहे. लोकशाहीचा जागर करण्यासाठी बाईक रॅली मध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन येत्या विधानसभा निवडणुकीत मताचा अधिकार बजावावा, असे आवाहन अतिरिक्त आयुक्त तथा प्रमुख स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांनी केले.
सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीत येणाऱ्या पिंपरी, भोसरी आणि चिंचवड मतदार संघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयुक्त शेखर सिंह आणि अतिरिक्त आयुक्त तथा स्वीप नोडल विजयकुमार खोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली उप आयुक्त अण्णा बोदडे यांच्या नियंत्रणाखाली मतदार जनजागृती अभियान राबविण्यात येत आहे. त्याअनुषंगाने शुक्रवार दि. १० नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ८.३० वाजता बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले असून निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथून या बाईक रॅलीचा प्रारंभ होणार आहे.
महापालिकेच्या वतीने शहरात विविध माध्यमातून मतदार जनजागृती अभियान राबाविण्यात येत आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या या अभियानाचा प्राथमिक उद्देश लोकांना लोकशाहीच्या या निवडणूकरुपी महाउत्सवात सहभागी करून घेऊन मतदानाचे प्रमाण वाढविणे हा आहे. महापालिका शहरातील महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, नवमतदार यांच्यासह समाजातील विविध घटकांपर्यंत पोहचण्यासाठी अनेक उपक्रम राबवीत आहे. नागरिकांना लोकशाहीतील त्यांच्या राष्ट्रीय कर्तव्याची जाणीव करून देऊन निवडणुकीत मतदान करण्यासाठी आवाहन करण्यात येत आहे. पिंपरी, भोसरी आणि चिंचवड या विधानसभा मतदारसंघात मतदानाचे प्रमाण वाढविण्यासाठी ही बाईक रॅली तिनही मतदार संघातील प्रमुख मार्गांवरुन सुमारे ३३ किलोमीटर अंतर पार करणार आहे.
निगडी येथील भक्ती शक्ती चौक येथून बाईक रॅलीची सुरुवात होणार असून पुढे मुकाई चौकात ही रॅली जाणार आहे. त्यानंतर संत तुकाराम महाराज ब्रिज वाल्हेकरवाडी मार्गे डांगे चौक थेरगाव- जगताप डेअरी – औंध रावेत मार्गाने जुनी सांगवी – नाशिक फाटा फ्लाय ओवर मार्गे भोसरी, असा या बाईक रॅलीचा मार्ग असणार आहे. बाईक रॅली मध्ये सहभागी होण्यासाठी नागरिकांनी https://fxurl.co/PCMCVoterAwarnessBikeRally या लिंकवर क्लिक करून नोंदणी करण्याचे आवाहन उपआयुक्त अण्णा बोदडे यांनी केले.