शबनम न्यूज | पुणे
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांना दिवसेंदिवस नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. शुक्रवारी जगताप यांनी कोंढवा, टिळेकरनगर भागाचा झंझावाती प्रचारदौरा केला. या वेळी नागरिकांनी त्यांचे जंगी स्वागत करीत आम्ही तुमच्या व महाविकास आघाडीच्या पाठीशी असून, येत्या निवडणुकीत भरघोस मतांनी आपल्याला विजयी करू, असा विश्वास दिला. या प्रचारयात्रेदरम्यान महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोंढव्यातील वीर येसाजी कामठे स्मारकास अभिवादन करून प्रचाराला सुरुवात झाली. आंबेडकर चौक, हनुमान चौक, भोलेनाथ चौक, शिवराज चौक, प्रतिभाताई पवार शाळा, लक्ष्मीनगर, हगवणे वस्ती, काकडेवस्ती, साळवे गार्डन रोड, इस्कॉन चौक, राजमाता कॉलनी, गोकुळनगर, क्रांती चौक, अंबामाता चौक, राजीव गांधी नगर, हिरामण बनकर शाळा, डॉल्फिन चौक, अंबामाता मंदिर अशा मार्गाने हा दौरा पार पडला. प्रचारमार्गावरील मंदिरे, स्मारके यांना अभिवादन करीत, नागरिकांच्या गाठीभेटी, ज्येष्ठांचे आशीर्वाद घेत जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली.
या प्रचार दौऱ्यात अनेक संस्था, संघटनांनी जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. चांदतारा चौक येथील हनीफभाई पठाण यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. पठाणी समाज जगताप यांच्या पाठीशी राहील, असा विश्वास त्यांनी दिला. गनिमी कावा युवा सेवा संघानेही जगताप यांना आपला पाठिंबा जाहीर केला. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांच्या पायांवर उभ्या असलेल्या महाराष्ट्राला गद्दारीचा सुरुंग लावलेल्यांना धडा शिकवण्यासाठी विजय मिळवू, असा विश्वास जगताप यांनी या वेळी व्यक्त केला.
पक्षाचे युवक शहर कार्याध्यक्ष दीपक कामठे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. कामठे परिवाराने त्यांचे स्वागत केले. कामठे परिवार या संघर्षाच्या काळात माझ्या पाठीशी ठामपणे उभा आहे, ही माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी बाब असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. हडपसरकरांचा मिळणारा प्रतिसाद व सहकाऱ्यांची ऊर्जा पाहून माझा आत्मविश्वास दुणावत आहे, असेही जगताप म्हणाले. हडपसरच्या विकासासाठी आपल्याला महाविकास आघाडी सरकार निवडून आणायचे आहे, असे आवाहन जगताप यांनी केले.