शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी-चिंचवड शहरामध्ये सातारा, सांगली, कोल्हापूर या भागातून शहरात स्थायिक झालेल्या नागरिकांची संख्या मोठी आहे. या नागरिकांचे मतदान हे दरवेळी निर्णायक भूमिका बजावत असते. गेली दोन टर्म आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असलेले सातारा, सांगली आणि कोल्हापूरकरवासी आमदार महेश लांडगे यांच्या पाठीशी यंदाही ठामपणे उभे आहेत. आमचे निर्णायक मतदान आम्ही आमदार महेश लांडगे यांच्या पारड्यात टाकून त्यांची हॅट्रिक निश्चित करणार आहे. कारण, २०१९ मध्ये उद्भवलेली महापूर परिस्थिती आणि महेश लांडगे यांचा ‘एक हात मदतीचा’ उपक्रम आम्ही विसरलो नाही, असा निर्धार मेळाव्यात व्यक्त करण्यात आला.
भोसरी विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या समर्थनार्थ सीजन बँक्वेट हॉल यमुनानगर येथे निर्धार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला सातारा, सांगली कोल्हापूरवासियांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. या मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादीच्या माजी महापौर व भोसरीच्या समन्वयक मंगला कदम यांनी केले.
मेळाव्यामध्ये आमदार महेश लांडगे यांच्या कामाचा लेखाजोखा सातारा, सांगली, कोल्हापूरच्या नागरिकांनी मांडला. भोसरी मतदारसंघात आमदार महेश लांडगे हे कुटुंबप्रमुखा प्रमाणे आपली भूमिका बजावत आहेत. गेली दहा वर्ष या मतदारसंघाला परिपूर्ण शाश्वत विकासाच्या कल्पनेतून पुढे नेण्याचे काम आमदार महेश लांडगे यांनी केली असल्याच्या भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. पश्चिम महाराष्ट्रातील महापुराच्या आठवणी जाग्या झाल्या.
तसेच, छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, इंजिनियरिंग कॉलेज, न्यायालय संकुल, पोलीस आयुक्तालय, मोशीतील हॉस्पिटल, संतपीठ, संविधान भवन अशा एक ना अनेक गोष्टी आमदार महेश लांडगे यांनी साकारल्या आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रत्येक समाजाच्या पाठीशी उभे राहण्याची त्यांची वृत्ती त्यांचे काम अधोरेखित करते. त्यांच्याकडे गेलेल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांच्याबद्दल आश्वस्त वाटते. त्यांच्या माध्यमातून येथे कायद्याची जरब निर्माण झाली आहे .ज्यामुळे आमच्या महिला भगिनींना सुरक्षित वातावरण मिळाले आहे, अशा प्रतिक्रियाही सांगली-सातारा- कोल्हापूरकरांनी दिल्या आहेत.
आमदार महेश लांडगे यांच्या बद्दल नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना हीच त्यांच्या कामाची पोचपावती आहे. यमुनानगर, कृष्णानगर, संभाजीनगर भागामध्ये त्यांनी आमदार निधीमधून मंदिर, समाज भवन यांसारखी कामे करून दिली आहेत. त्यामुळे समाजाची त्यांच्या प्रति आस्था आहे. हीच कामे त्यांच्यासाठी विजयाची हॅट्रिक मिळवून देतील असा विश्वास आहे. - मंगला कदम, माजी महापौर पिंपरी-चिंचवड.
कोणत्याही समाजाप्रती उदात्त भावना ठेवून त्यांचा आदर करणे हीच भाजपा आणि महायुतीची कार्यशैली आहे. देव-देश-धर्म, समाज त्यानंतर आपण हे धोरण केवळ बोलण्यापुरते न ठेवता अंगीकारण्याचा प्रयत्न गेल्या १० वर्षांत केलेला आहे. पिंपरी-चिंचवडच्या प्रगतीशील वाटचालीमध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातून वास्तव्यास आलेल्या सर्व जाती-धर्माच्या नागरिकांचे योगदान आहे. भूमिपुत्रांच्या त्यागातून आणि कामगार-कष्टकऱ्यांच्या घामातून हे शहर उभे राहिले. ‘शेवटच्या घटकाचा विकास’ आणि तळागाळातील नागरिकांना सर्वोतोपरी मदतीचा हात, हीच माझी भावना राहीली आहे. - महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, उमेदवार महायुती.