आमदार शेळके यांनी आंबेडकरी जनतेला सर्वाधिक न्याय दिला – सूर्यकांत वाघमारे
रिपब्लिकन पक्षाच्या मेळाव्यात शेळके यांच्या विक्रमी मताधिक्याचा निर्धार
शबनम न्यूज : प्रतिनिधी
कामशेत, १४ नोव्हेंबर – मावळातून 2009 मध्ये ‘भाऊ’ विरुद्ध ‘भाई’ अशी लढत झाली होती. यावेळी भाई आणि भाऊ यांची हात मिळवणी कशी झाली, हे एक न सुटलेले कोडे आहे, अशी टिप्पणी रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रदेश सचिव सूर्यकांत वाघमारे यांनी आज (गुरुवारी) केली.
मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- भाजप- शिवसेना- आरपीआय- एसआरपी महायुतीचे उमेदवार आमदार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ कामशेत येथे रिपब्लिकन पक्ष आठवले गटाचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यात ते बोलत होते.
मेळाव्यास ज्येष्ठ नेते माऊली दाभाडे, मावळ पंचायत समितीचे माजी सभापती विठ्ठलराव शिंदे, भाजपचे तळेगाव शहराध्यक्ष संतोष दाभाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा संघटक संजय बावीस्कर, कुलस्वामिनी महिला मंचच्या प्रमुख सारिका सुनील शेळके, आरपीआयचे तालुकाध्यक्ष नारायण भालेराव, आरपीआय युवक तालुकाध्यक्ष अंकुश सोनवणे, पुणे जिल्हा संघटक अतुल सोनवणे, पुणे जिल्हा सरचिटणीस गणेश गायकवाड, मावळ तालुका कार्याध्यक्ष अशोक सदावर्ते, लोणावळा शहर अध्यक्ष कमलशील म्हस्के, देहूरोड शहराध्यक्ष अरविंद गायकवाड, तळेगाव शहराध्यक्ष संदीप शिंदे, पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस यमुना साळवे, पुणे जिल्हा अध्यक्ष मालनताई बनसोडे, मावळ तालुका अध्यक्ष भावना ओव्हाळ तसेच सर्व विभागीय अध्यक्ष, महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याला महिला कार्यकर्त्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
सूर्यकांत वाघमारे म्हणाले की, 2019 मध्ये भाऊच्या बाजूने आम्ही भाईच्या विरोधात लढलो होतो. आता तेच भाऊ भाईंना पुढे करून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. एवढे परिवर्तन कसे झाले, हा एक न सुटणारा प्रश्न आहे.
गेली पंधरा वर्षे रिपब्लिकन पक्ष आठवले गट महायुतीचा घटक पक्ष म्हणून काम करीत आहे. पण आमच्या पक्षाला आणि पक्षातील कार्यकर्त्यांना खरा न्याय गेल्या अडीच वर्षात मिळाला आहे, असे वाघमारे यांनी सांगितले.
महायुतीत भाजपकडे आम्ही मित्रपक्ष म्हणून अनेकदा न्याय मागितला, पण आम्हाला तो कधीच मिळाला नाही. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष महायुतीत सहभागी झाल्यानंतर अजितदादांनी आम्हाला खूप मदत केली व न्याय मिळवून दिला, असे वाघमारे म्हणाले.
आमदार सुनील शेळके यांनी तालुक्यात आंबेडकरी जनतेसाठी गेल्या पाच वर्षात खूप काही केले आहे. तालुक्यातील बौद्धकालीन लेण्यांचे संवर्धन, तळेगाव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाचा विकास, देहूरोड येथील ऐतिहासिक बुद्धविहाराचा विकास यात शेळके यांनी मोठे योगदान दिले. आदिवासी व मागासवर्गीय समाजाच्या विकासासाठी शेळके यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. आंबेडकरी जनतेला सर्वाधिक विकास निधी शेळके यांच्यामुळेच उपलब्ध झाला, अशी माहिती वाघमारे यांनी दिली.
सर्व समाजांना बरोबर घेऊन पुढे वाटचाल करणाऱ्या आमदार शेळके यांना पुन्हा विक्रमी मताधिक्याने विधानसभेत पाठवण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे कार्यकर्ते जीवाची बाजी लावतील, अशी ग्वाही वाघमारे यांनी यावेळी दिली.
‘सुनील शेळके तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है’, ‘महायुतीचा विजय असो’, ‘रिपब्लिकन पक्षाचा विजय असो’ अशा कार्यकर्त्यांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.