प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ हडपसरमध्ये जाहीर सभा
पुणे: ‘एकेकाळी हडपसर हे सामाजिक चळवळींचे केंद्र होते. इथे रयत शिक्षण संस्थेचे मोठे जाळे आहे. चांगले शिक्षण या भागात दिले जाते. अनेक मोठमोठ्या कंपन्या, उद्योग येथे आहेत. अण्णासाहेब मगर, रामराव तुपे यांच्यासारख्या बऱ्याच मंडळीनी योगदान दिले. सामान्य माणसांचे हित जपण्याचे काम त्यांनी केले. लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचे काम पूर्वी व्हायचे. विठ्ठलराव तुपे त्यात होते. त्यांचा वारसा त्यांचा मुलगा पुढे चालवेल, असे वाटले होते. म्हणून त्यांना मागीलवेळी विधानसभेवर पाठवले. परंतु, त्यांना लोकांचे प्रश्न सोडवण्यात कवडीचीही आस्था नाही. त्यांनी भ्रमनिरास केला. त्यामुळे अशा निष्क्रिय व्यक्तीला घरचा रस्ता दाखवण्याची वेळ आलेली आहे. ती तुम्ही हडपसरच्या लोकांनी दाखवावी आणि कामाचा माणूस निवडावा,’ असे आवाहन शरद पवार यांनी केले.
हडपसर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रशांत सुदाम जगताप यांच्या प्रचारार्थ माळवाडी, हडपसरमध्ये आयोजित जाहीर सभेत शरद पवार बोलत होते. प्रसंगी प्रशांत जगताप यांच्यासह माजी खासदार ॲड. वंदना चव्हाण, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब शिवरकर, माजी आमदार ॲड. जयदेव गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे, समाजवादी नेते प्रा. सुभाष वारे, माजी महापौर अंकुश काकडे, राष्ट्रवादीच्या युवती अध्यक्ष सक्षणा सलगर, झोपडपट्टी सुरक्षा दलाचे भगवानराव वैराट, माजी उपमहापौर बंडूतात्या गायकवाड, माजी नगरसेवक योगेश ससाणे, ॲड. हेमा पिंपळे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहरप्रमुख संजय मोरे, उपशहरप्रमुख समीर तुपे, राष्ट्रवादी’चे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष प्रवीण तुपे, रवींद्र माळवदकर, माजी नगरसेवक विजय देशमुख, निलेश मगर, प्रशांत सुरसे, पल्लवी सुरसे, नमेश बाबर, गायक राजेश सरकटे आदी उपस्थित होते. दिलीप तुपे, अनिल तुपे, कुमार तुपे, संजय साळवे, अहमद काझी यांनी कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
“सावित्रीबाई, रमाईच्या महाराष्ट्रात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराच्या घटना दुर्दैवी आहेत. महायुतीच्या काळात महिलांवरील अत्याचाराच्या ६७,३८१ तक्रारी, तर मुली-महिला बेपत्ता होण्याच्या ६४ हजार घटना नोंदल्या गेल्या आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांच्या जिल्ह्यात १३ हजार मुली बेपत्ता आहेत. महिलांना सन्मान व सुरक्षा देण्यात अपयशी ठरलेल्या महायुती सरकारची सुट्टी करण्याची वेळ आली आहे,” अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
शरद पवार म्हणाले, “सत्ताधारी केवळ स्वार्थाचे राजकरण करीत आहेत. शेतकरी, महिला, तरुण यांच्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या सर्वाधिक आत्महत्या होत आहेत, ही दुःखाची गोष्ट आहे. काळ्या आईची सेवा करणारा, लाखोंचा पोशिंदा संकटात असताना महायुतीचे लोक काहीही करत नाहीत. लाडकी बहीण योजना राबविली जात असताना त्यांचा सन्मान व सुरक्षा पायदळी तुडवली जात आहे. राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. बेरोजगारी, महागाईच्या ओझ्याने सर्वसामान्य नागरिक पिचला जात आहे. सत्ताधारी पक्षातील लोक मात्र, स्वतःची प्रसिद्धी आणि घरे भरण्याचे काम करत आहेत.”
महाविकास आघाडीचा अंकुश
सहा महिन्यापूर्वी लोकसभा निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी ‘अबकी बार चारशे पार’चा नारा देत होते. सरकार चालवायला ३०० खासदार पुरेसे असतात. असे असूनही, यांना ४०० पार का जायचे, याचा विचार केल्यावर लक्षात आले की यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेली राज्यघटना बदलायची आहे. तशा स्वरूपाची वक्तव्ये त्यांच्या अनेक खासदारांनी व नेत्यांनी केली होती. भाजपचा व मोदींचा हा डाव हणून पाडण्यासाठी आम्ही सर्व लोक एकत्र बसलो, इंडिया आघाडी स्थापन केली आणि लोकसभेला त्यांना अडीचशेच्या आतमध्ये आणले. घटनेला हात घालू पाहणाऱ्या भाजपवर अंकुश ठेवण्याचे काम राज्यातही महाविकास आघाडीने केले आणि ४८ पैकी तब्बल ३० जागा जिंकल्या. त्यामुळे घटनेत बदल करण्याचे त्यांचे मनसुबे उधळले गेले, असे शरद पवार यांनी नमूद केले.
हडपसर स्वतंत्र महापालिका करणार
काळ बदलला तसे हडपसर देखील बदलले आहे. येथील शेतीचे स्वरूप बदलले. शहराचा व्याप वाढला आहे. त्यामुळे महापालिकेला हडपसरच्या समस्या सोडवणे जिकिरीचे होत आहे. या शहराला आता स्वतंत्र महापालिकेची गरज आहे. शहराचा चांगला विकास आराखडा करून नवीन पालिकेचा निर्णय घेऊ. त्यासाठी येथील प्रश्नाचा जाणकार, लोकांप्रती आस्था असलेला माणूस विधानसभेत पाठवावा लागेल. प्रशांत जगताप यांनी महापौर म्हणून केलेले काम प्रभावी आहे. तुतारी फुंकणारा माणूस तुमच्या हिताचा असणार आहे. तोच तुमच्या सुखदुःखात सहभागी होऊन आपुलकीची फुंकर घालणार आहे. तेव्हा येत्या २० तारखेला तुम्हाला वाऱ्यावर सोडणाऱ्याची सुट्टी करून तुतारी वाजवणारा माणूस चिन्ह दाबून प्रशांत जगताप यांना निवडून देण्याचे आवाहन करतो, असे पवार म्हणाले.
महायुतीमुळे महाराष्ट्र पिछाडीवर
शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा महाराष्ट्र अग्रस्थानी होता. मात्र, गेल्या काही वर्षांत महायुतीच्या चुकीच्या धोरणांमुळे महाराष्ट्र आता ११ व्या क्रमांकावर गेला आहे. येथे चांगले शिक्षण, पदवीधरांना नोकऱ्या देण्यात सरकार अपयशी ठरले आहे. उद्याच्या निवडणुकीत या निष्क्रिय सरकारला घरी बसवून महाविकास आघाडीला सत्तेत जाण्याची संधी द्या. शिक्षण, रोजगार, महिला सुरक्षा, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे काम महाविकास आघाडी करेल. राज्यात सगळीकडे फिरतो आहे. महाराष्ट्राची सत्ता ज्यांच्या हाती आहे, त्यांच्याकडून प्रश्नांची सोडवणूक झाली नसल्याने परिवर्तन होणे गरजेचे असल्याची भावना सर्वच स्तरांतून उमटत आहे. उद्याचे संकट टाळण्यासाठी यांच्या भूलथापांना बळी पडू नये. राज्याच्या हिताचा विचार करणाऱ्या महाविकास आघाडीला आशीर्वाद देऊन विकासाच्या दिशेने वाटचाल करण्यास आपण प्राधान्य द्यावे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी घटनाविरोधी भाजप व त्यांना साथ देणाऱ्या संधीसाधू लोकांना सत्तेपासून हटवण्याचे काम आपल्याला करावे लागेल, असे शरद पवार यांनी निक्षून सांगितले.
प्रशांत जगताप म्हणाले, “याच चेतन तुपे यांनी फुटीर आमदारांना फोन केले होते. पवार साहेबांचे वय झाले असून, आपल्याला अजितदादांसोबत जायचे आहे. पवार साहेबांना आपण वय, जाती, धर्म यामध्ये बांधू शकत नाही. आजवर कोणत्याही आमदाराने हडपसरमध्ये गद्दारी केली नव्हती. मात्र, यांनी पितृतुल्य पवार साहेबांशी गद्दारी केली. त्यामुळे गद्दारी विरुद्ध स्वाभिमानी, निष्क्रियता विरुद्ध विकास अशी ही लढाई आहे. वडीलधाऱ्यांचा सन्मान ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र, यावर घाला घालण्याचे काम गेल्या काही वर्षांत झाले. संपर्क नसलेला, कोणत्याही कामाला नकार देणारा आमदार आपण पाहिला. असा अकार्यक्षम आमदार घरी बसवायचा आहे. हडपसरला वाहतूककोंडी, पाणीटंचाई, गुन्हेगारी मुक्त बनवायचे आहे. मुळशी धरणातून तीन टीएमसी पाणी आणून हडपसरचा पाणीप्रश्न सोडवेन. येथे मेट्रो आणू, भैरोबानाला येथे दुमजली उड्डाणपूल उभारू, कात्रज चौकात ग्रेडसेप्रेटर व उड्डाणपूल उभारून वाहतूक कोंडी सोडविण्याचा आमचा प्रयत्न राहील. हडपसरला स्वतंत्र महापालिका आणण्याला आमचे प्राधान्य राहणार आहे. कालभैरवनाथाची जयंती व यात्रा पुन्हा सुरु केली जाईल. तेव्हा आपण निर्णय घेऊन येत्या २० तारखेला तुतारी वाजवणारा माणूस चिन्हासमोरील बटन दाबून माझ्या पाठीशी उभे राहावे.”
बाळासाहेब शिवरकर म्हणाले, “मुजोर महायुती सरकारला राज्यातून हद्दपार करायचे आहे. लोकशाही, संविधानाचे महत्व कायम राखण्यासाठी महाविकास आघाडीची सत्ता येणे आवश्यक आहे. हडपसरमध्ये एक चांगला, सुसंस्कृत व विकासाचा चेहरा उमेदवार म्हणून दिलेला आहे. त्यांना निवडून आणायची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्वानी एकदिलाने काम करून जगताप यांना अधिकाधिक मताधिक्य देण्याचा प्रयत्न करावा.”
सलक्षणा सलगर म्हणाल्या, “शरद पवार हीच महाराष्ट्राची ऊर्जा आहे. तळपत्या तालवारीसारखा झंझावात पवार साहेबांचा आहे. गद्दारांना गाडून खुद्दारांना निवडून द्यायचे, हाच दृढनिश्चय हडपसरच्या जनतेने केला आहे. ही लढाई स्वाभिमानाची, अस्मितेची आहे. हा सह्याद्रीचा पर्वत महाराष्ट्रावर येणाऱ्या संकटांचा सामना करण्यासाठी पाय रोवून उभा आहे. स्वर्गीय विठ्ठल तुपेदेखील या दिवट्याला घरी बसवा, असेच म्हणत असतील.”
पुण्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्ता महाविकास आघाडीसोबत समर्पित भावनेने काम करीत असून, प्रशांत जगताप यांच्यांसह इतर सर्वच उमेदवारांना निवडून आणण्यासाठी मेहनत घेत आहेत, असे संजय मोरे यांनी नमूद केले. ॲड. हेमा पिंपळे, योगेश ससाणे, विजय देशमुख, दिलीप आबा तुपे यांनीही आपले विचार मांडले. प्रवीण तुपे यांनी प्रास्ताविक केले.