शबनम न्यूज | पिंपरी चिंचवड
रविवार दि. ०१ डिसेंबर २०२४ रोजी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेचे पदाधिकारी यांनी देवेन्द्रजी फडणवीसांची मुंबईत जाऊन भेट घेतली व त्यांचेकडे पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीस उद्योगमंत्री पद मिळावे अशी मागणी केली. या भेटीमध्ये संघटनेचे अध्यक्ष – संदीप बेलसरे, संचालक – संजय सातव, प्रमोद राणे, नवनाथ वायाळ, भारत नरवडे, अतुल इनामदार, सचिन आदक, स्विकृत संचालक- श्रीपती खुणे यांचा समावेश होता.
पिंपरी चिंचवड शहर ही औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. पिंपरी चिंचवड महानगर पालिका व एम.आय.डी.सी. औद्योगिक परिसरात साधारणपणे 20 ते २५ हजार लहानमोठे उद्योग कार्यरत आहेत. त्यापैकी पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेकडे साधारणपणे ४५०० हजार लघु उद्योजक हे सभासद आहेत.
नोव्हेंबर २०२४ मध्ये पार पडलेल्या महाराष्ट्र विधान सभेच्या निवडणुकांमध्ये महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालेले असून यामध्ये भोसरी, पिंपरी, चिंचवड, या विधानसभा मतदार संघाचा समावेश होतो. या तीनही विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार यांना पिंपरी चिंचवड लघुउद्योग संघटनेने जाहीर पाठींबा दिलेला होता. या तीनही विधानसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार भरघोष मताधिक्याने विजयी झाले त्यामध्ये
१) भोसरी- महेशदादा लांडगे
२) पिंपरी- अण्णा बनसोडे
३) चिंचवड- शंकर जगताप तसेच
विधानपरिषदेवर अमित गोरखे
यांची निवड झालेली आहे.
या पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्वच उद्योजक सभासदांची आपणास विनंती आहे की, या पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरीतील एखाद्या तरी आमदाराला महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री पद आपल्या मंत्रिमंडळात द्यावे.
पिंपरी चिंचवड शहर हे उद्योगाचे शहर आहे आणि ते सर्व बाजूने कनेक्टीव्हिटी असल्याकारणाने पश्चिम महाराष्ट्र, नाशिक, अहिल्यानगर, संभाजीनगर, सातारा, कोल्हापूर या औद्योगिक परिसराला जवळच असल्याने उद्योजकांचे काही प्रोब्लेम असल्यास ते ताबडतोब
सोडविण्यास मदत होईल. तसेच महाराष्ट्र राज्य उद्योगधंद्यात कायमस्वरूपी एक नंबरवर राहण्यास मदत होईल. तरी या औद्योगिक नगरीतील एखाद्या आमदाराला आपल्या मंत्रिमंडळात उद्योगमंत्री पद मिळावे, असे सदर निवेदनात म्हंटले गेले आहे.