प्रशांत दामले हे चित्रपटात हिटलरच्या, तर आनंद इंगळे चर्चिलच्या भूमिकेत आहेत. त्यांच्यासह वैभव मांगले, गीतांजली कुलकर्णी, सुनील अभ्यंकर, मनमित पेम, रितिका श्रोत्री, प्रणव रावराणे, अद्वैत दादरकर, गणेश मयेकर, दीप्ती लेले, राजेश मापुस्कर हे चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकार चित्रपटात झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती मधुगंधा कुलकर्णी, विवेक फिल्म्सचे भरत शितोळे आणि मयसभा करमणूक मंडळी यांची असून लेखन-दिग्दर्शन परेश मोकाशी यांचे आहे.
चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच ‘मु. पो. बोंबीलवाडी’बद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली होती. आधी ‘कोण होणार हिटलर?’ ही उत्सुकता होती आणि त्याचे उत्तर मिळाल्यावर ती अधिक वाढत गेली. त्यानंतर चित्रपटाचे प्रमोशनल साँग अर्थात प्रसारगीत प्रदर्शित झाले आणि या ‘कॉपीराइट फ्री’ गाण्याने धमाल उडवून दिली. परेश मोकाशी यांनी लिहिलेले हे गाणे तन्मय भिडे या २२ वर्षीय संगीतकाराने संगीतबद्ध केले असून, अवधूत गुप्ते आणि वैभव मांगले यांनी ते गायले आहे.
त्याआधी चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित झाले होते. त्यावरून ही स्वातंत्र्यपूर्व काळातील एक ब्रिटीशकालीन कथा आहे आणि एका बॉम्बस्फोटाभोवती ती फिरते, हे स्पष्ट होते. प्रत्यक्षात ती पडद्यावर कशी साकारली गेली असेल, याबद्दल रसिकांना कुतूहल आहे. काही वर्षांपूर्वी आलेल्या आणि प्रचंड गाजेलेल्या याच नावाच्या नाटकाचे हे चित्रपटीय स्वरूप आहे. रसिकांच्या मागणीवरून ही चित्रपट निर्मिती संहितेत काही बदल करून केली गेली आहे, असे परेश मोकाशी म्हणाले.
या चित्रपटाबद्दल बोलताना मधुगंधा कुलकर्णी म्हणाल्या, “हा चित्रपट म्हणजे एक लाफ्टर राईड आहे. प्रशांत दामले यात हिटलर करत असल्याने चित्रपट आपोआपच मोठा झाला. त्यांनी अप्रतिम काम केले आहे. कलाकारांची एक उत्तम भट्टी चित्रपटात जमून आली असून, आजच्या टीझरमध्ये त्याची एक झलक दिसून येते.”
प्रशांत दामले यांनी हिटलर कसा दिला आहे, असे तुम्हाला वाटते, असे विचारले असता, मोकाशी म्हणाले, “हा प्रश्न मला खरेतर खऱ्या हिटलरला विचारावासा वाटतो, की ‘काय रे तुझे जमले आहे का? तुला असे वगायाला जमेल का आयुष्यात?”
हा चित्रपट प्रेक्षकांनी का पहावा, असा प्रश्न विचारला असता मोकाशी यांनी मिश्कील उत्तर दिले आहे. “आजकाल व्यायाम नीट होत नाही, त्यामुळे फुप्फुसानाही व्यायाम होत नाही. ‘मुक्काम पोस्ट बोंबीलवाडी’ एवढा हसवतो की त्यामुळे फुप्फुसांना खूप व्यायाम होतो… गमतीचा भाग सोडला तर, चित्रपट उत्तम झाला आहे. कलाकारांची इतर तंत्रज्ञांची उत्तम साथ मिळाल्याने भट्टी चांगलीच जमून आली आहे. आजच्या टीझरनंतर प्रेक्षक चातकासारखी चित्रपटाची वाट पाहतील याची मला खात्री आहे.”
चित्रपटाचे निर्माते विवेक फिल्म्सचे भरत शितोळे म्हणाले, “फिल्म निर्मिती क्षेत्रात आलो आणि ठरवले की मराठी व हिंदी चित्रपट करायचे. पण नेमका कोणता चित्रपट करायचा वगैरे विचारात असताना परेशजी आणि मधुगंधाजींनी ‘मु. पो. बोंबीलवाडी’चा विषय सांगितला आणि आम्ही लगेच हो म्हटले. चित्रपटाच्या घोषणेपासूनच आम्हाला प्रेक्षकांकडून मोठा प्रतिसाद मिळतो आहे.”