तेलुगु चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध अभिनेता अल्लू अर्जुन याला पोलिसांनी अटक केली आहे. हैदराबादमध्ये ४ डिसेंबर रोजी ‘पुष्पा’ चित्रपटाच्या प्रीमियरवेळी घडलेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या घडामोडींमुळे चित्रपटसृष्टीला धक्का बसला असून आता अल्लू अर्जुनवर काय कारवाई होणार? याची चर्चा सुरू झाली आहे. ४ डिसेंबरला घडलेल्या या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेमध्ये एका ३९ वर्षीय महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या महिलेचा मुलगा रुग्णालयात असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
चेंगराचेंगरी प्रकरणी पोलिसांनी अभिनेता अल्लू अर्जुन, संध्या थिएटर व्यवस्थापन आणि अल्लू अर्जुनच्या सुरक्षा पथकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्लू अर्जुन आणि त्याची टीम संबंधित थिएटरवर ‘पुष्पा २’ चित्रपटाच्या प्रीमियरसाठी येणार आहे, याबाबत पोलिसांना कोणतीही माहिती नव्हती, अशी माहिती इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तात नमूद करण्यात आली आहे.
शुक्रवारी दुपारच्या सुमारास हैदराबाद पोलीस आयुक्तांची टास्क फोर्स आणि चिक्कडपल्ली पोलीस स्थानकाचे पोलीस अधिकारी व कर्मचारी अल्लू अर्जुनच्या घरी पोहोचले. त्यांनी तिथून त्याला ताब्यात घेतलं. या अटकेपासून संरक्षण मिळावं, यासाठी अल्लू अर्जुननं तेलंगणा उच्च न्यायालयात अपीलही केलं होतं. पण अद्याप त्याला या प्रकरणात कोणताही दिलासा मिळालेला नाही. अल्लू अर्जुननं केलेली याचिका अद्याप सुनावणीसाठीच आलेली नाही. मात्र, त्याआधीच पोलिसांनी त्याला अटक केल्यामुळे यावरून आता मोठी चर्चा सुरू झाली आहे.
अल्लू अर्जुनला शुक्रवारी दुपारी अटक करण्यात आल्यानंतर चिक्कडपल्ली पोलीस स्थानकात नेण्यात आलं आहे. याच पोलीस स्थानकात चेंगराचेंगरीत महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.