शबनम न्यूज , वृत्तसंस्था :
पिंपरी :पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम नगर मध्ये मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट झाला आहे. या कुत्र्यांचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठानचे अध्यक्ष संतोष म्हात्रे यांनी केली आहे.
संत तुकाराम नगर मध्ये मोकाट कुत्र्यांची वाढ मोठ्या प्रमाणात झाली आहे. लहान मुले व महिलांना या कुत्र्यांपासून धोका निर्माण झाला आहे. अनेक वेळा कुत्रा चावल्याची घटना येथे घडली आहे. तसेच मागील पंधरा ते वीस दिवसापासून या कुत्रा चावण्याच्या घटनेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. लहान मुलांना किंवा महिलांना रस्त्यातून जाताना कुत्र्यांची भीती वाटत आहे. कुत्रा चावल्यानंतर रेबीज सारखा जीवघेणा आजार होत असतो व अशा रुग्णांची संख्या पिंपरी चिंचवड शहरात वाढत असल्याचे संतोष म्हात्रे यांनी म्हटले आहे. तरी लवकरात लवकर मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा अशी मागणी संतोष म्हात्रे यांनी पिंपरी चिंचवड शहरातील पाचही आमदार यांच्याकडे केली आहे. यामध्ये आमदार महेश लांडगे, आमदार अण्णा बनसोडे, आमदार शंकर जगताप, आमदार अमित गोरखे, यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे.