‘सिम्बायोसिस’ व ‘सौ. शीला राज साळवे मेमोरिअल ट्रस्ट’ यांच्यातर्फे कोरेगाव भीमा येथे आरोग्यसेवा
पुणे: कोरेगाव भीमा येथे २०७ व्या शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी आलेल्या लाखो भीमसैनिकांना आरोग्यसेवा पुरविण्यात आली. सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठ व ‘सौ. शीला राज साळवे मेमोरिअल ट्रस्ट’ यांच्यातर्फे कोरेगाव भीमा येथे ‘भीमरुग्ण सेवा’ आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते.
सिम्बायोसिस’चे संस्थापक पद्मभूषण डॉ. शां. ब. मुजुमदार व साळवे मेमोरियल ट्रस्टचे प्रमुख ऍड. अविनाश राज साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या आरोग्य शिबिरात हजारो भीमसैनिकांनी औषधोपचाराचा लाभ घेतला. गेल्या सहा वर्षांपासून आरोग्यसेवेतून विजयस्तंभास मानवंदना देण्याचा उपक्रम या दोन्ही संस्थांकडून राबविण्यात येत आहे.
या आरोग्य शिबिराचे उद्घाटन पुण्याचे नगरविकास अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या हस्ते झाले. प्रसंगी पाणी पुरवठा विभागाचे अभियंता सुरेश साखरे, सुशील मोहिते, ऍड. अतुल राज साळवे आदी मान्यवर उपस्थित होते. आरोग्य तपासणी, गोळ्या-औषधांचे वाटप, वेदनाशामक औषधे वाटप करण्यात आली.
प्रशांत वाघमारे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. देशभरातून आलेल्या भीमसैनिकांना सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून आरोग्य सेवा पुरविण्याचे कार्य कौतुकास्पद आहे. सिम्बायोसिस विद्यापीठ आणि साळवे मेमोरियल ट्रस्टने नेहमीच अशा उपक्रमांमध्ये पुढाकार घेतेलेला आहे. या उपक्रमामुळे हजारो लोकांची सेवा झाली आहे. विजयस्तंभाला अनोख्या पद्धतीने केलेले अभिवादनच आहे, असे वाघमारे म्हणाले.
ऍड. अविनाश राज साळवे म्हणाले, “शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी खेड्यापाड्यातून कोरेगाव भीमा येथे लाखो भीमसैनिक येतात. अनेकजण पायी चालत येत असतात. अशा सर्वांना अभिवादन स्थळी आरोग्य सुविधा पुरवण्याच्या उद्देशाने या ‘भीमरूग्ण सेवा’ आरोग्य शिबिराचे आयोजन केले जाते. हजारो लोकांवर उपचार केल्याचे समाधान मिळते.