शबनम न्यूज : प्रतिनिधी
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांची भावना;
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग भारताचे आर्थिक विकास पुरुष
ऍड. पांडुरंग थोरवे यांचे मत;
शांत, संयमी व आपलेसे वाटणारे डॉ. मनमोहन सिंग यांचे
शांत, संयमी व आपलेसे वाटणारे डॉ. मनमोहन सिंग यांचे
व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील: ऍड पांडुरंग थोरवे
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने भारताच्या अर्थशास्त्राचे शिल्पकार डॉ. मनमोहन सिंग यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन
पुणे: भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग नव्या पिढीसाठी आदर्श मार्गदर्शक आहेत. अर्थतज्ज्ञ असलेल्या डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थमंत्री, पंतप्रधान म्हणून देशाला समृद्धीच्या दिशेने नेले. भारतीय अर्थव्यवस्थेला सावरण्यासाठी, तसेच प्रगतीपथावर नेण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान प्रत्येक भारतीय नागरिकाच्या मनात सदैव राहील, यांचे विचार सर्वांसाठी प्रेरणादायी असून ते सर्वानी आचरणात आणणे काळाची गरज आहे ” अशी भावना सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केली.
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी आयोजित श्रद्धांजली सभेत प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया बोलत होते. प्रसंगी संस्थेतील सर्व पदाधिकारी, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. मनमोहन सिंग यांनी आपले विलक्षण नेतृत्व, प्रामाणिकपणा आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी असलेल्या असामान्य दृष्टिकोनाने देशाची निरंतर सेवा केली, असेही त्यांनी नमूद केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “डॉ. मनमोहन सिंग हे एक प्रख्यात अर्थशास्त्रज्ञ आणि उत्कृष्ट प्रशासक होते. त्यांनी भारताच्या आर्थिक सुधारणांना दिशा दिली. आपल्या देशाला जागतिक पातळीवर प्रतिष्ठित स्थान मिळवून दिले. १९९०-९१ साली अर्थमंत्री म्हणून त्यांनी घेतलेल्या सुधारणा निर्णयांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेला नवीन उंची गाठता आली. त्यांचे साधे आणि विनम्र व्यक्तिमत्त्व, तसेच प्रामाणिकपणावर असलेला दृढ विश्वास, सर्वांना प्रेरणा देणारे ठरले आहे. देशाच्या प्रगतीसाठी त्यांनी केलेल्या योगदानाची आठवण प्रत्येक भारतीयाच्या मनात कायम राहील.”
“त्यांच्या जाण्याने आपल्याला एक अभूतपूर्व मार्गदर्शक गमवावा लागला आहे. २०४७ चा भारत घडविण्यासाठी आपण तयार असायला हवे. आजूबाजूचे एकूणच वातावरण युद्ध, राजकीय आणि आर्थिक अनागोंदी यांनी प्रभावित असताना सामान्य नागरिकांपासून ते देश पातळीवर त्यांच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती. त्यांचा होकारार्थी आणि समस्येवर मात करीत पुढे जाण्याचा दृष्टिकोन सर्वांनीच आत्मसात करण्याची गरज आहे. विचारमंथनातून विविध विषयांचा अभ्यास आणि प्रश्नांची उकल होणे महत्वाची असल्याकडे त्यांनी सर्वांचे लक्ष वेधले.”
सूर्यदत्तचे सल्लागार समितीचे सदस्य ऍड पांडुरंग थोरवे म्हणाले, “शांत, संयमी आणि आपलेसे वाटणारे डॉ. मनमोहन सिंग यांचे व्यक्तिमत्व प्रत्येक भारतीयाच्या स्मरणात राहील. भारताचे आर्थिक विकास पुरुष म्हणून भारतीय त्यांना ओळखतील. अर्थमंत्री व पंतप्रधान असताना त्यांनी केलेले कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. सर्व सामान्य जनतेसाठी त्यांनी राबविलेली आर्थिक धोरणे महत्वाची, तसेच भारताला आर्थिक संकटातून बाहेर आणणारी ठरली. त्यांनी राबविलेली आर्थिक धोरणे सर्वांसाठी मार्गदर्शक तत्वे ठरतील.”
उपस्थित सर्व विद्यार्थी, प्राध्यापक वृंद आणि कर्मचाऱ्यांनी ‘एक सुजाण भारतीय नागरिक म्हणून जबाबदारी आणि कर्तव्याचे पालन करीत स्वतः स्वप्नातील भारताची निर्मिती करण्यासाठी कार्यरत राहू’ अशी प्रतिज्ञा घेतली. प्रा. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो ओळ :
सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सच्या वतीने भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली अर्पण करताना प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, पदाधिकारी, विद्यार्थी, प्राध्यापक वृंद आणि कर्मचारी.