शबनम न्यूज : प्रतिनिधी
पुणे : ,भारतीय कृषि अनुसंधान परिषद, अटारी, झोन-८, पुणे यांचे वतीने केव्हीके बाभळेश्वर येथे आयोजित शेतकरी परिसंवाद कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने येथील अधिकारी तसेच कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी यांनी सहभाग घेतला. सदर कार्यक्रम मा. श्री. शिवराज सिंह चौहान, कृषि आणि शेतकरी कल्याण व ग्रामविकास मंत्री, भारत सरकार, नवी दिल्ली, मा.ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य, डॉ. सुब्रोतो रॉय, संचालक, आय.सी.ए.आर.-अटारी, झोन -८, पुणे, डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, श्री. सिद्धाराम सालीमठ, जिल्हाधिकारी, अहमदनगर व श्री. आशिष येरेकर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
सदर कार्यक्रमाची सुरुवात कृषि प्रदर्शनाचे उद्घाटन करून झाली. यावेळी मा. श्री. शिवराज सिंह चौहान, डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील, व डॉ. सुब्रोतो रॉय यांनी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या प्रदर्शन स्टॉल ला भेट दिली. कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. श्यामसुंदर कौशिक यांनी केव्हीके मार्फत प्रसारित केल्या जाणाऱ्या पिक आधारित शेती तंत्रज्ञान, पशुपालनातील आधुनिक तंत्रज्ञान, कृषि यांत्रिकीकरण तसेच केव्हीके दहिगाव-ने द्वारा निर्मित जैविक शेती निविष्ठा इत्यादी विषयी पाहुण्यांना अवगत केले; मान्यवरांनी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने करत असलेल्या कामाची स्तुती केली.
सदर कार्यक्रमात कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव ने चे यशस्वी शेतकरी श्री. नवनाथ लक्ष्मण उकिर्डे, साकेगाव, तालुका पाथर्डी यांना कृषि ड्रोन फवारणी उद्योजकतेसाठी तर यशस्वी शेतकरी श्री. मोहन गंगाधर तुवर, पाचेगाव, तालुका नेवासा यांना सेंद्रिय गुळ निर्मिती उद्योगासाठी केंद्रीय कृषिमंत्री मा.शिवराज सिंह चौहान यांचे हस्ते प्रशस्तीपत्र, सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. यावेळी कृषि विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने सर्व शास्त्रज्ञ व कर्मचारी तसेच ५० हून अधिक प्रगतशील शेतकऱ्यांनी या कार्यक्रमात व कृषि प्रदर्शनात सहभाग घेतला.