शबनम न्यूज | पिंपरी
‘पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव’ हा तीन दिवसीय कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी परस्पर समन्वयातून काम करावे, कार्यक्रमात उपस्थित दिव्यांग बांधव, नागरिक, लोकप्रतिनिधी आणि मान्यवरांना कोणत्याही सोयीसुविधांची कमतरता भासणार नाही याची काळजी घ्यावी. तसेच या कार्यक्रमात दिव्यांग बांधव आणि सामाजिक संस्थांचा सहभाग वाढविण्यावर भर द्यावा, अशा सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी आज दिल्या.
१७ ते १९ जानेवारी २०२५ या कालावधीत दिव्यांग बांधवांसाठी महापालिकेच्या वतीने पर्पल जल्लोष तथा उत्सव दिव्यांगांचा या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिव्यांग बांधवांसाठी आयोजित केलेला हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा उत्सव असून असा उत्सव राबविणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका ही पहिली महानगरपालिका ठरणार आहे. या कार्यक्रमाच्या आयोजन नियोजनाबाबत आढावा बैठक मोरवाडी येथील दिव्यांग भवन येथे पार पडली, त्यावेळी आयुक्त शेखर सिंह बोलत होते.
या बैठकीस अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, दिव्यांग भवन फाउंडेशनचे व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश देशमुख, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, औद्योगिक प्रशिक्षण संस्था मोरवाडी प्राचार्य शशिकांत पाटील, उप आयुक्त तानाजी नरळे, मुख्य सुरक्षा अधिकारी उदय जरांडे, मुख्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी ओमप्रकाश बहिवाल, विशेष अधिकारी किरण गायकवाड, सहाय्यक आयुक्त श्रीनिवास दांगट, प्रशासन अधिकारी किरणकुमार मोरे, कार्यकारी अभियंता बापूसाहेब गायकवाड, दिव्यांग भवन फाउंडेशनचे सल्लागार विजय खान्हेकर, अभिजित मुरुगकर, गिरीश परळीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी परेश गांधी, प्रहार दिव्यांग संघटनेचे राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र तांबे, महिला अध्यक्ष संगीता जोशी यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी महापालिकेच्या वतीने ‘पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमात त्यांनी बनविलेल्या वस्तूंचे स्टॉल देखील उभारण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम तसेच दिव्यांगांसाठी खास चित्रपट महोत्सवाचेही आयोजन केले जाणार आहे. या कार्यक्रमात दिव्यांग बांधवांसाठी योग्य त्या सोयी सुविधांची उपलब्धता करून देण्यात येणार आहे. या तीन दिवसीय कार्यक्रमाच्या कामकाज आणि नियोजनाबाबत आयुक्त शेखर सिंह यांनी आज झालेल्या बैठकीत सविस्तर आढावा घेतला.
‘पर्पल जल्लोष – दिव्यांगांचा महाउत्सव’ हा देशातील दिव्यांग बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला सर्वात मोठा उत्सव असणार आहे. या उत्सवात मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव सहभागी होणार असल्याने त्यांच्यासाठी हा कार्यक्रम संस्मरणीय राहण्यासाठी सर्व नियुक्त पदाधिकारी तसेच स्वयंसेवकांनी जोमाने काम करावे, असेही आयुक्त शेखर सिंह यावेळी म्हणाले.