शबनम न्यूज | पुणे
“कृत्रिम बुद्धिमत्ता (आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआय) तंत्रज्ञानाने सर्वच क्षेत्रात क्रांती होताना दिसत आहे. पत्रकारिता क्षेत्रही त्याला अपवाद नाही. येत्या काळात ‘एआय’चा फायदा मोठ्या प्रमाणात होईल. पण त्याचे काही तोटेही आहेत. ‘एआय’ ही एक दुधारी तलवार असून, त्याचे फायदे आणि तोटे समजून घेऊन चांगल्या कामांसाठी ‘एआय’चा प्रभावी वापर व्हायला हवा,” असे आवाहन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. विद्वत्ता, कर्तृत्व व नम्रता हे गुण आपल्या अंगी असायला हवेत, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मराठी पत्रकार दिन साजरा होतो. त्या पार्श्वभूमीवर मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजित महाराष्ट्रातील पहिल्या ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन मीडिया इनोव्हेशन हॅकॅथाॅन’चे उद्घाटन अकरा नद्यांचे जलपूजन करून चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले. सेनापती बापट रस्त्यावरील हॉटेल जेडब्ल्यू मॅरियट येथे आयोजित सोहळ्यात केंद्रीय सहकार व हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, लोकमतचे समूह संपादक विजय बाविस्कर, ‘पुण्यनगरी’चे समूह संचालक भावेश शिंगोटे, सकाळच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, ‘लोकमत न्यूज १८’चे निवेदक विलास बडे, विलास जावडेकर डेव्हलपर्सचे मुख्य कार्यकारी अध्यक्ष आदित्य जावडेकर, हॅपटीक इंडियाचे प्रमुख दीपक कुलकर्णी, मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष किरण जोशी, सचिव मनिष केत, पुणे शहराध्यक्ष पंकज बिबवे आदी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, “मराठी पत्रकार संघाने हा आगळावेगळा कार्यक्रम घेतला आहे. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता पत्रकारितेच्या क्षेत्रात कसे वापरता येईल यावर विचारमंथन होईल. ‘एआय’च्या प्रभावी वापरासाठी सरकारही प्रयत्नशील आहे. नवीन पॉलिटेक्निक, अभियांत्रिकी महाविद्यालयात ‘एआय’ विषय अनिवार्य करण्यात येत आहे. विद्यमान ४२ पॉलिटेक्निक आणि २८ अभियांत्रिकी शासकीय महाविद्यालयाना प्रयोगशाळा अद्ययावत करण्यासाठी प्रत्येकी ९ कोटी देण्याचा निर्णय झाला आहे. त्यासाठी केंद्र सरकानेही ४०० कोटी मंजूर केले आहेत. वर्तमानपत्रात ‘एआय’चा वापर सुरु झाला आहे. ‘एआय’च्या मदतीने वर्तमानपत्र वाचू व ऐकू शकतो, हा क्रांतिकारी बदल आहे.”
पत्रकारांनी स्वतःसाठी नव्हे, तर समाजासाठी काम करायला हवे, असे विजय बाविस्कर यांनी सांगितले. या हाकेथॉनमध्ये एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पीव्हीपीआयटी सांगली आणि ट्रिनिटी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड रिसर्च या महाविद्यालयाच्या संघाना पारितोषिक देण्यात आले. ‘एआय आणि माध्यमांचे भवितव्य’ या विषयावरील परिसंवादात तज्ज्ञ मंडळींनी विचारमंथन केले. किरण जोशी यांनी पत्रकार संघाच्या कार्याविषयी, तसेच कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका मांडली. आदित्य जावडेकर स्वागत-प्रास्ताविक केले. संदीप चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. मनीष केत यांनी आभार मानले.