शबनम न्यूज | पिंपरी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्रीडा विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासनमान्य ‘ब’ वर्ग ग्रंथालयामधील हुतात्मा चापेकर सार्वजनिक ग्रंथालय व श्री भैरवनाथ सार्वजनिक ग्रंथालय यांचे संयुक्त विद्यमाने १४ आणि १५ जानेवारी २०२५ रोजी चिंचवड येथील हुतात्मा चापेकर स्मारक येथे ग्रंथ प्रदर्शन व सामुहिक वाचन उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले असणार आहे.
महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या माध्यमातून वाचनसंस्कृतीला चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत महापालिकेच्या वतीने भरविण्यात येणाऱ्या या ग्रंथ प्रदर्शनामध्ये वाचकांना विनामुल्य वाचन साहित्य उपलब्ध असणार आहे. तसेच याठिकाणी विविध विषयांचे आणि सुप्रसिद्ध लेखकांचे वाचन साहित्य विक्रीसाठीही ठेवण्यात येणार आहे. याव्यतिरिक्त, दोनही दिवशी सामुहिक वाचनाचेही आयोजन करण्यात आले आहे.
वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाअंतर्गत पिंपरी चिंचवड महापालिका क्रीडा विभाग आयोजित ग्रंथ प्रदर्शन व सामुहिक वाचन हा केवळ पुस्तकांचा उत्सव नसून, ज्ञान, कल्पनाशक्ती आणि सामाजिक बांधिलकीचा एक महत्त्वाचा ठेवा आहे. खाजगी आणि सार्वजनिक ग्रंथालयांच्या सहकार्याने वाचकांसाठी सर्व वयोगटांसाठी व त्यांच्या आवडींसाठी समृद्ध अनुभव निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या उपक्रमात सहभागी व्हावे. - विजयकुमार खोराटे, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका