शबनम न्यूज | पिंपरी
चिखली येथील महापालिका टाऊन हॉल व व्यायामशाळेचे दीड वर्षा पूर्वी उद्घाटन होवूनसुद्धा हा टाऊन हॉल आणि व्यायामशाळा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे, परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचे गॅदरिंग, मनोरंजन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अडचणी येत आहेत. तसेच जादा पैसे मोजून इतरत्र जावे लागते त्यामुळे तातडीने टाऊन हॉल आणि व्यायाम शाळा नागरिकांसाठी खुली करावी अशी मागणी माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी केली आहे.
याबाबत भाजपचे माजी नगरसेवक कुंदन गायकवाड यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह आणि उपायुक्त विजयकुमार खोराटे यांना याबाबत निवेदन दिले. यावेळी माजी स्वीकृत नगरसेवक दिनेश यादव, संदीप शेलार, महेश आवटे, प्रकाश चौधरी, सुरज यादव, तुषार हजारे, अनिकेत जाधव उपस्थित होते.
निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून मोठ्या पाठपुराव्यामुळे प्रभाग क्रं १ मधील सोनवणे वस्ती रोड, चिखली येथील टाऊन हॉल आणि व्यायामशाळा उभारण्यात आली आहे.
समाविष्ट गावांमधील या पहिल्याच टाऊन हॉलचे काम फेब्रुवारी 2023 मध्ये पूर्ण झाले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीमध्ये लोकार्पण झाले आहे.
मात्र, गेले दीड वर्षे उद्घाटन होवूनसुद्धा हा टाऊन हॉल आणि व्यायामशाळा सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध झालेली नाही. परिणामी, परिसरातील नागरिकांना सांस्कृतिक कार्यक्रम, शाळेचे गॅदरिंग, मनोरंजन इत्यादी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी अडचणी येत आहेत.
चिखली प्रभागात सुंदर सांस्कृतिक भवन उभारण्यात असताना देखील प्रभागातील शाळांना बाहेर ठिकाणी कार्यक्रम घ्यावा लागतो. याबाबत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे. परिणामी, प्रशासनाने टाऊन हॉल व व्यायामशाळा कार्यान्वयीत करावे, अन्यथा सर्व चिखली ग्रामस्थांना सोबत घेवून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा कुंदन गायकवाड यांनी दिला आहे.