शबनम न्यूज | पिंपरी
वाहन चोरी करणाऱ्या दोघांना पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट एकने अटक केली. त्यांच्याकडून सहा लाख ५५ हजार रुपये किमतीच्या आठ दुचाकी जप्त केल्या. चिखली, पिंपरी, भोसरी, चाकण, शिवाजीनगर, निगडी पोलिस ठाण्यातील नऊ वाहने चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.
रफिक उमर जमादार (३७, रा. मोशी), नीलेश मनोहर गायकवाड (३०, रा. चिखली), अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चिखली पोलिस ठाण्यात वाहन चोरीच्या एका गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेकडून केला जात होता. चिखली येथील वाहन पोलिस रेकॉर्डवरील गुन्हेगार रफिक जमादार आणि नीलेश गायकवाड यांनी चोरी केली असून, त्या दुचाकी विक्री करण्यासाठी केएसबी चौक आणि एमआयडीसी ब्लॉक दोन येथे लपवून ठेवल्या असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट एकला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना अटक करत त्यांनी लपवून ठेवलेल्या आठ दुचाकी जप्त केल्या.
गुन्हे शाखा युनिट एकचे पोलिस निरीक्षक सुहास आव्हाड, उपनिरीक्षक शिवाजी कानडे, पोलिस अंमलदार मनोजकुमार कमले, सोमनाथ बोऱ्हाडे, महादेव जावळे, गणेश महाडिक, सचिन मोरे, प्रमोद हिरळकर, प्रमोद गर्जे, अजित रूपनवर, तुषार वराडे, तानाजी पानसरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पोलिसांकडून याप्रकरणी तपास सुरु आहे. घडलेल्या चोरीच्या घटनांमधील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.