शबनम न्यूज : सोलापूर (दि.१४ एप्रिल) वृत्तसंस्था :- सोलापूरमध्ये ‘एक रुपयात एक लिटर पेट्रोल’ उपक्रम राबविण्यात येत आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने सोलापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टुडंट युनियनच्यावतीने एक अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या अनोख्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. नागरिकांनी ही देखील पेट्रोल पंपावर चांगलीच गर्दी केलेली आहे.
सध्या नागरिक इंधन दरवाढीने त्रस्त आहेत, त्यात युनियनच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या या उपक्रमाचे नागरिक चांगलाच लाभ घेत आहेत. इंधनदरवाढीने त्रस्त नागरिकांना एक रुपयात एक लिटर पेट्रोल वाटप करण्यात येत आहे. सोलापुरातल्या डॉ. आंबेडकर स्टुडंट्स आणि युथ पँथर्स या संघटनेच्या वतीने हा उपक्रम राबवण्यात आला. सोलापुरात आज पेट्रोलचा दर १२०.१८ रुपये आहे. सध्या महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. पेट्रोलचे दर हे १२० रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहेत. त्यामुळे नागरिकांना दिलासा देण्यासाठी पाचशे नागरिकांना एक रुपयाप्रमाणे पेट्रोल देत बाबासाहेबांना अभिवादन करत असल्याची भूमिका संघटनेच्या वतीने मांडण्यात आली. त्यामुळं एक रुपयाचं पेट्रोल घेण्यासाठी डफरीन चौकातल्या पंपावर नागरिकांनी गर्दी केली.