शबनम न्युज | मुंबई
अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील घराजवळ झालेल्या गोरीबाराप्रकरणी आरोपी अनुज थापन (वय ३२) याने मुंबई पोलिसांच्या मुख्यालयातील कोठडीत बुधवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाकडून तपास करण्यात येणार आहे. त्याच्या आत्महत्येची नेमके कारण अद्यापही स्पष्ट झालेले नाही.
अनुज थापन याला ठेवण्यात आलेल्या कोठडीत एकूण दहा आरोपी होते. सलमान प्रकरणातील अन्य दोन आरोपींना पोलिसांनी जबाब नोंदविण्यासाठी नेले होते. व थापन अन्य आरोपींसह कोठडीतच होता. दुपारी बाराच्या सुमारास आरोपींना देण्यात येणाऱ्या चादरीचा तुकडा फाडून तो शौचालयात गेला. तेथेच त्यानी गळफास घेऊन आत्महत्या केली.
दुपारी एकच्या सुमारास अन्य एका आरोपीने हा प्रकार पाहिला व आरडाओरडा करून पोलिसांना बोलावले.थापनला तातडीने जीटी रुग्णालयात नेण्यात आले तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. आझाद मैदान पोलिसांनी रुग्णालयात जाऊन प्राथमिक माहिती घेतली व मृतदेह शवविच्छेदनासाठी जे जे रुग्णालयात पाठवला. कोठडीत आरोपीचा मृत्यू झाल्यानंतर त्रयस्थ पोलीस विभागामार्फत चौकशी करण्यात येते. थापनने गुन्हे शाखेच्या कोठडी आत्महत्या केल्यामुळे आता या प्रकरणी सीआयडी मार्फत तपास करण्यात येणार आहे.