शबनम न्युज | पिंपरी
‘वेपन डीलर’ सह चौघांना अटक करत त्यांच्याकडून सात पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडाविरोधी पथकाने ही कारवाई केली. शहरातील शस्त्रांची बेकायदेशीर खरेदी-विक्री यानिमित्ताने मोडून निघाली. अर्जुन भाऊराव सूर्यवंशी (वय २०, रा. आळंदी), तुषार नथुराम बच्चे (३१, रा. मोशी), कमल रामदास राठोड (२६, रा. नाणेकरवाडी, ता. खेड), अंकित भस्के अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
सहायक पोलिस आयुक्त बाळासाहेब कोपनर यांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडाविरोधी पथकातील अंमलदार गणेश सावंत, सुमित देवकर आणि विनोद वीर यांना मरकळ गाव येथे गुन्हेगार पिस्तूल घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. अर्जुन सूर्यवंशी याला सापळा लावून ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि दोन काडतुसे जप्त केली. सूर्यवंशी याच्या विरोधात आळंदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. त्याच्याकडे केलेल्या तपासात त्याने वेपन डीलर अंकित भस्के याच्याकडून पिस्तूल विकत आणले असल्याचे सांगितले. सूर्यवंशी याने भस्के याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि काडतूस विकत घेऊन ते सराईत गुन्हेगार तुषार बच्चे याच्याकडे ठेवण्यास दिल्याचेही त्याने सांगितले.
पोलिसांनी मोशी येथून बच्चे याला ताब्यात घेत त्याच्याकडून दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.
दरम्यान, अंकित भस्के याला अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर पोलिसांनी पिस्तूल बाळगल्या प्रकरणी अटक केली होती. तो न्यायालयीन कोठडीत असताना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला कारागृहातून ताब्यात घेतले. त्याच्याकडून आणखी दोन पिस्तूल आणि एक काडतूस जप्त केले.