शबनम न्युज | मुंबई (वृत्तसंस्था)
राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते दहावीत शिकणाऱ्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांसाठी तयार करण्यात आलेल्या गृहविज्ञान व शरीरशास्त्र या विषयावरील एका सामायिक क्रमिक पुस्तकाचे राजभवन, मुंबई येथे आज प्रकाशन करण्यात आले.
दहावीच्या दृष्टीबाधित विद्यार्थ्यांना विज्ञान भाग १ व २ या विषयांची प्रॅक्टिकल करताना अडचणी होत असल्यामुळे उपरोक्त दोन विषयांची पुस्तके तयार करण्यात आली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. रोटरी क्लब ऑफ हिरानंदानी इस्टेट या संस्थेच्या पुढाकाराने ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन व मिल्टन कंपनीच्या सहकार्याने शाळांमध्ये मोफत वितरणासाठी या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे.
दिव्यांग व्यक्तींचे विधेयक तयार करणाऱ्या संसदीय समितीचे आपण अध्यक्ष होतो. दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नको, तर सहकार्य करण्याची आवश्यकता आहे असे राज्यपालांनी सांगितले. शासनाकडून दिव्यांग व्यक्तींना विविध ऑर्थोपेडिक उपकरणे तसेच श्रवणासाठी कॉक्लिअर इम्प्लांटसाठी देखील मदत केली जाते. रोटरी क्लबने केवळ दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी ब्रेल लिपीतील पुस्तके तयार करून न थांबता पुढील वर्गांसाठी लागणारी ब्रेल लिपीतील क्रमिक पुस्तके देखील तयार करून घ्यावी, अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.