शबनम न्युज | सांगवी
‘माझ्या लेकराला आणि मला कोणीतरी मारेल, माझ्यामागे भूत लागले आहे,’ अशी भीती वाटल्याने महिलेने तिच्या चार वर्षाच्या चिमूरड्यासह इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारली. यात दोघाही मायलेकांचा मृत्यू झाला. वाकड येथील यमुनानगर मधील रेगुलिया सोसायटीत शनिवार (दि. २०) पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली. कोमल संकेत आवटे-हरिश्चंद्र (वय ३२) आणि विहान संकेत आवटे (वय ४) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल आणि संकेत आवटे यांचा २०१८ मध्ये विवाह झाला. त्यानंतर संकेत नोकरी निमित्त अमेरिकेत गेले. त्यावेळी कोमलही पतीसोबत अमेरिकेत गेली. दरम्यान कोमल यांना मानसिक आजाराचा त्रास सुरू झाला. मुलगा विहाण आणि मला कोणीतरी मारेल, माझ्या मागे भूत लागले आहे, अशी त्यांना भीती वाटायची. त्यामुळे अमेरिकेत त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्यांना मानसिक त्रास सुरूच राहिल्याने त्या दोन दिवसांपूर्वी भारतात परतल्या. त्यांच्यावर पुणे येथे उपचार करण्यात येणार होते. त्यासाठी संबंधित डॉक्टरांची वेळ देखील घेण्यात आली होती. त्यासाठी कोमल आणि त्यांचे मुलगा विहान हे दोघेही वाकड येथील यमुनानगर येथील त्यांच्या घरी आले होते.
त्यांच्यासोबत त्यांचे सासू-सासरे तसेच आई-वडीलही होते. दरम्यान, मानसिक त्रास जाणवत असल्याने कोमल यांना जास्त भीती वाटू लागली, त्यांनी शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास अकराव्या मजल्यावरून विहान सोबत उडी मारली. यात खाली पडून विहान आणि कोमल दोघेही जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात होते. शेजारच्यांनी सुरक्षारक्षकांना माहिती दिली, सुरक्षारक्षकांनी कोमल यांच्या घरच्यांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोमल आणि विहान यांना सांगवी येथील रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारा पूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याची डॉक्टरांनी सांगितले.