शबनम न्युज | पिंपरी
पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांचे जीवनमान सुधारून त्यांना उत्तम सोयी सुविधा देण्यासाठी महापालिकेच्या उद्यान विभाग प्रामुख्याने प्रयत्नशील आहे. शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना सर्व सुविधा देण्यासाठी महापालिका प्रशासन आघाडीवर असून त्यासाठी महापालिकेने पी सी एम सी दक्ष नावाचे ॲप्लिकेशन तयार केले आहे. सदर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून उद्यानातील प्रत्येक कामावर लक्ष ठेवण्यात येत असून कर्मचाऱ्यांना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून दैनंदिन कामाचे वाटप सुद्धा केले जात आहे. यामुळे संबंधित ठेकेदार यांच्याकडून काम पूर्ण न झाल्यास ठेकेदारास प्रतिदिन दंड सुद्धा आकारण्यात येत आहे.
याच अनुषंगाने अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी शहरातील विविध उद्यानास भेटी दिल्या. यामध्ये ड क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत वाकड येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले उद्यान, पिंपळेनिलख येथील कै. प्रभाकर साठे उद्यान, शहीद अशोक कामठे उद्यान, या उद्यानांचा समावेश होता.
या पाहणीदरम्यान उपआयुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे तसेच स्थापत्य आणि उद्यान विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. यावेळी अतिरिक्त आयुक्त जांभळे पाटील यांनी उद्यानांची पाहणी करून विविध दुरुस्तीबाबत सूचना दिल्या.
अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी उद्यानांच्या मुख्य गेट समोरील साफसफाई करून गेट समोर पार्किंग करण्यासाठी प्रतिबंध घालावा, ओपन जिमच्या कडेने सुगंधित रोपांची व बांबूच्या झाडांच्या लागवड करावी, फुटपाथच्या बाजूने वडेलिया / पंपास ग्रास / कामिनी / डूराटा / माल्फेजिया वृक्षांची लागवड करावी, सीमा भिंतीलगत बांबूच्या झाडांची लागवड करावी तसेच उद्यानातील बॉक्समध्ये एकाच जातींच्या वृक्षांची लागवड करावी, उद्यानामध्ये साफसफाई ठेऊन नागरिकांना अडथळा होणार नाही किंवा अडचणी येणार नाही अशा पद्धतीने उद्यानांची देखभाल दुरुस्ती करावी इ. सुचना दिल्या.
उद्यानातील कामांवर ॲप्लिकेशनच्या माध्यमातून राहणार लक्ष शहरातील उद्यानांमध्ये नागरिकांना उत्कृष्ट सेवा मिळाव्यात यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. पीसीएमसी दक्ष ॲप्लिकेशनच्या माध्यमातून उद्यानातील कामांवर लक्ष ठेवण्यात येणार असून कर्मचारी, ठेकेदार यांनी कामामध्ये हलगर्जीपणा करू नये. - प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका