विश्वकर्मा पब्लिकेशन्स प्रकाशित लेखिका गौरी इंदुलकर लिखित ‘देवाच्या शोधात… माझा प्रवास’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून गोविंददेव गिरी बोलत होते. सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात झालेल्या सोहळ्याला माजी संमेलनाध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, अनिल इंदुलकर, विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल सोनी, सहसंपादक संदीप तापकीर, रवीना व अर्जुन इंदुलकर आदी उपस्थित होते.
स्वामी गोविंददेव गिरी म्हणाले, “गौरी इंदुलकरांनी ‘देवाच्या शोधात…’ हा प्रांजळपणे मांडलेला साधनापट आहे. स्वतःचा शोध घेण्याच्या प्रवासात आलेल्या अद्भुत अनुभूतींचा लेखाजोखा मांडला आहे. यातील अनेक प्रसंग काहींना अंधश्रद्धा वाटतील. पण ते त्यांनी अनुभवलेले सत्य आहे. अध्यात्माला अंधश्रद्धेच्या नजरेतून पाहणारे अनेक धृतराष्ट्र पुण्यात आहेत. पण श्रद्धेचा सन्मान करणारे अनेकजण आहेत. त्यामुळे अध्यात्माला समजून घेत बाजारीकरण, भोंदूगिरीपासून आपण दूर राहायला हवे.”
डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, “विज्ञान विधायक व विनाशकारी स्वरूपाचे आहे. परंतु, अध्यात्म विधायक व ‘वसुदेव कुटुंबकम’ ही भूमिका देणारे आहे. भारताचे अध्यात्मिक चित्र आणि चरित्र वर्णन करण्याचा प्रयत्न गौरी इंदुलकर यांनी केला आहे. विज्ञानाला पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे अध्यात्मातून मिळतात. श्रद्धेशिवाय माणूस जगू शकत नाही. अध्यात्माचा धंदा करणाऱ्या ढोंगी महाराज, बुवांमुळे अध्यात्मावरचा विश्वास कमी झाला आहे.”
डॉ. पी. डी. पाटील म्हणाले, “गौरी आणि अनिल इंदुलकर यांचा भक्तिसाधनेचा प्रवास बऱ्याच वर्षांपासून बघतो आहोत. अनुभूती आणि अनुभव याचे मिश्रण म्हणजे हे पुस्तक आहे. गुरू, ईश्वर, शास्त्र आणि स्वयम यातील स्वयम नसेल, तर इतर तीन गोष्टींचा उपयोग नाही. गुरू तुमची परीक्षा घेतात; पण हात कधी सोडत नाहीत. गुरू मिळणे भाग्याची गोष्ट असते. गुरूचा आशीर्वाद आपली कुंडलिनी जागृत व्हायला मदत करते.”
गौरी इंदुलकर म्हणाल्या, “भगवती देवींच्या आशीर्वादाने मला ही साधना करता आली. ही साधना करताना अनेक अद्भुत अनुभव आले. ईश्वरी साक्षात्कार झाले. हे सगळे डायरीच्या स्वरूपात लिहून ठेवले होते. ही सगळी साधना पुस्तक रूपात उतरत आहे, याचा विलक्षण आनंद होतोय.”
कार्यक्रमाच्या सुरवातीला संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. विशाल सोनी यांनी स्वागत-प्रास्ताविक केले. संदीप तापकीर यांनी संपादकीय मनोगत केले. डॉ. लता पाडेकर यांनी सूत्रसंचालन केले. अनिल इंदुलकर यांनी आभार मानले.