शबनम न्यूज | धुळे
क्राईम | प्रतिनिधी – दिलीप सोनकांबळे
धुळे : शहरातील जगन्नाथनगर, देवपूर येथे सोमवारी (ता. २६) भरदुपारी विवाहितेचा घरात घुसून खून झाल्याची घटना घडली. मारेकऱ्याने तीक्ष्ण हत्याराने विवाहितेच्या मानेवर व पोटावर वार करून पलायन केले. आर्थिक देवाणघेवाणीवरून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फरारी हल्लेखोरांच्या शोधासाठी दोन पोलिस पथके रवाना झाली आहेत.
जगन्नाथनगर येथे जितेंद्र पाटील यांच्या मालकीच्या घरात भिकन पाटील (रा. कापडणे) आई, पत्नी शीतल व दोन मुलांसह दोन ते तीन वर्षांपासून भाडेतत्त्वावर राहतात. त्यांचा नानखटाई, कुरकुरे विक्रीचा व्यवसाय आहे. सोमवारी (ता. २६) दुपारी एकच्या सुमारास संशयिताने घरात घुसून शीतल (वय ३२) यांच्यावर धारदार हत्याराने वार केले.
त्या वेळी त्यांच्या सासूबाई पोळ्या करीत होत्या, तर पती भिकन पाटील वरच्या मजल्यावरील नातेवाइकांकडे गेले होते. शीतल यांच्या सासूबाईंना कमी ऐकू येते. मात्र, खालच्या मजल्यावर कोणी तरी ओरडत असल्याचा आवाज भिकन पाटील यांना आल्याने ते धावतच खाली आले.
त्या वेळी पत्नी शीतल रक्ताच्या थारोळ्यात पडलेली त्यांना दिसली. तोपर्यंत मारेकरी पसार झाला होता. त्यानंतर शेजारीही धावत आले. शीतल यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी दिनकर पिंगळे, पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख पथकासह घटनास्थळी दाखल झाले. श्वान पथक, ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी चाकू जप्त केला. पाटील यांच्या फिर्यादीनुसार संशयित सोमनाथ कुवर याच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल झाला. तो फरारी असून, त्याच्या शोधासाठी दोन पथके रवाना करण्यात आली, असे पोलिस निरीक्षक देशमुख यांनी सांगितले.