पिंपरी-चिंचवड महा पालिका आयुक्त राजेश पाटील यांची माहिती
शबनम न्युज | पिंपरी-चिंचवड
पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
गेल्या साडेचार वर्षात महापालिकेच्या अधिका-यांच्या बैठकांचे सत्र त्या-त्या आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्याचं प्रमाण वाढलं आहे. त्यामुळं इथून पुढे पदाधिकारी, आमदार, खासदार, यांच्या घरी कार्यालयात कोणी विकासकामा बाबत मिटींग ला गेल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पिंपरी-चिंचवड महा पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील वर्ग एक आणि दोनचे अधिकारी बायोमेट्रीक हजेरी लावून साईट व्हीजटच्या नावाखाली नगरसेवक-आमदाराच्या घरी, जनसंपर्क कार्यालयावर तासनंतास हजेरी लावत आहेत. सत्ताधारी भाजपच्या आमदारांनी उठसूट अधिका-यांना फोन करुन त्रस्त केले आहे. प्रत्येक छोट्या-मोठ्या कामासाठी कार्यालयावर हेलपाटे मारण्यास सांगत आहेत. याबाबत महापालिका आयुक्त राजेश पाटील हे लवकरच लगाम घालणार आहेत.
विविध प्रलंबित कामकाजाच्या अनुंषगाने सर्व बैठका पालिकेत घेण्यात येतील, त्याकरिता नगरसेवक, आमदारांच्या कार्यालयात, घरी जाण्याची आवश्यकता नाही, असले सर्व प्रकार यापुढे बंद करु, असा इशारा आयुक्त राजेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला.
चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांनी नुकतीच (दि.२५ ऑक्टोबर) मतदारसंघातील प्रलंबित कामांबाबत महापालिका अधिकाऱ्यांची बैठक पिपळे गुरव येथील कार्यालयात घेतली. त्यात, त्यांनी कामे रखडल्याबद्दल पालिका अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली होती. या बैठकीला हजेरी लावणारे शहर अभियंत्यासह सर्वच अधिकारी अडचणीत आले आहेत. कारण ते महापालिका कार्यालयाबाहेरील अशा बैठकीला का आणि कसे गेले, याचा जाब त्यांना महापालिका आयुक्त राजेश पाटील हे विचारणार आहेत. यापुढे असले प्रकार बंद करू, असंही पाटील यांनी म्हटलं आहे.
या बैठकीत आपल्या नगरसेवक, कार्यकर्त्यांसमोर अधिका-यांना दमदाटी करणे, आरेरावीत बोलणं, त्यांची कानउघडणी करणे, अपमानस्पद वागणूक देणं अशा प्रकारे कित्येक अधिका-यांना त्रासाला सामोरे जावे लागल्याचे बोलले जात आहे.
यावरुन महापालिका आयुक्त राजेश पाटील यांना पालिकेऐवजी आमदारांच्या कार्यालयात बैठकांचे प्रमाण वाढल्याचा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर यापुढे आमदार, खासदार यांची निवासस्थाने आणि कार्यालयात आता महापालिका अधिकाऱ्यांना अशा बैठका होणार नाहीत. महापालिका कार्यालयातच अशा कार्यालयीन बैठका होणे अपेक्षित आहे. याविषयी सविस्तर माहिती घेतो. कोण-कोण अधिकारी बैठकीला जातात. त्यांना याबाबत जाब विचारत, का आणि कसे बैठकीस गेलात, याविषयी जाब विचारण्यात येईल. असं पाटील यांनी सांगितले.
यामुळे आता निवडणुकीच्या तोंडावर शहरातील नगरसेवक, आमदार, खासदारांना महापालिका अधिकाऱ्यांना आपल्या घरी वा कार्यालयात अशा बैठकांसाठी बोलावता येणार नाही. यामुळे लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात नेहमीच दिसणारे काही अधिकारी आता नागरिकांना त्यांच्या कार्यालयात भेटण्याची शक्यता आहे.