राष्ट्रवादी युवक काँग्रेस तर्फे शहीद वीर भगतसिंग यांची जयंती उत्साहात साजरी
शबनम न्युज | पिंपरी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड शहर कार्यालयात शहीद भगतसिंग यांची 115वी जयंती साजरी करण्यात आली. त्यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शहराध्यक्ष इम्रानभाई शेख यांच्या हस्ते वीर भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी बोलताना युवक अध्यक्ष इम्रान शेख म्हणाले, “भगतसिंग त्यांच्या सोबतच्या तरूणांना एक गोष्ट नेहमीच सांगत असत कि तुमच्या ज्ञानाचा उपयोग जर इथल्या श्रमकरी, कष्टकरी, शेतकरी आणि शोषित समाजासाठी होत नसेल तर, त्यांच्या सामाजिक आणि शैक्षणिक उन्नतीसाठी होत नसेल तर तुम्ही शिकूनही अक्कलशून्य आहात , तुमच्या ज्ञानाला काहीच किंमत नाही”
“आजची परिस्थिती पाहताना स्वतंत्र भारतात जे काही घडत आहे ते वीर भगतसिंग यांनी स्वातंत्र्य पूर्ण काळातच ओळखले होते. त्यांच्या मते ज्या पद्धतीने स्वातंत्र्याचा लढा लढला जातोय,त्याने देशाला गोऱ्या इंग्रजांच्या कडून स्वातंत्र्य तर मिळेल परंतु इथले भांडवलदार काळे इंग्रज आपल्यावर राज्य करतील वीर भगतसिंग यांचे ते विधान आज तंतोतंत खरे ठरल्याचे दिसून येते, आज इथला खूप मोठा वर्ग भांडवलदारांच्या चाकरीत अडकला आहे. भांडवलदारांच्या पाठबळावर पैशाच्या जोरावर निवडून दिलेली सरकार पाडल्या जात आहेत. देशाचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जाणारा हा मीडिया देखील भांडवलदारांनी विकत घेतला आहे. युवकांना नकली राष्ट्रभक्तीमध्ये गुंतवण्यात येत आहे. जाणून मोजून युवकांना धर्मांध बनवले जात आहे. जातीपातीत विष कालवले जात आहे.श्रीमंत अधिक श्रीमंत तर गरीब अधिक गरीब होत चालला आहे… सत्ता,न्याय व्यवस्था भांडवल दारांची गुलाम झालेली असल्याचे दिसून येत आहे.
त्यामुळे आजच्या तरुणांनी वीर भगतसिंग यांच्या कार्याचा आणि विचारांचा अभ्यास करून सामाजिक आणि राजकीय कार्यात सहभागी व्हायला पाहिजे आणि वीर भगतसिंग यांच्यासारखं समाजात परिवर्तन घडवण्यात सिंहाचा वाटा घेतला पाहिजे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणिस दिपक गुप्ता, अनुज देशमुख, शहरसचिव ओम क्षिरसागर, अनिकेत आवारे, मेंनेजमेंट सेल चे अध्यक्ष अकबर मुल्ला, अपंग सेल चे अध्यक्ष अशोक कुंभार, सुधाकर कांबळे, नागेश काळे, दीपक गायकवाड,सुनीता काळे,धनाजी तांबे,सुनील आडागळे यांसह अनेक मान्यवर व पदाधिकारी उपस्थित होते.