शबनम न्युज | तळेगाव
‘मला लग्न करायचे नाही,’ असा मेसेज करून नवरदेवाने लग्नाच्या दिवशीच विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. ही घटना तळेगाव दाभाडे येथे मंगळवारी (दि. १६) सकाळी घडली. सुरज राजेंद्र रायकर (वय २८, रा. माळीनगर तळेगाव) असे आत्महत्या केलेल्या नवरदेवाचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरजचा मंगळवारी लग्न सोहळा होता. घरात लग्नाची धामधूम सुरू होती. दरम्यान, ‘मला लग्न करायचे नाही’, असा मेसेज त्याने मामाला व्हाट्सअप वर पाठवला. त्यानंतर मंगळवारी पहाटे तो घराबाहेर पडला. कुटुंबीयांनी त्याची सर्वत्र शोधाशोध केली मात्र तो आढळून आला नाही. काही वेळानंतर परिसरातील विहिरीजवळ त्याची दुचाकी तसेच मोबाईल आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस अधिकारी आणि वन्यजीव रक्षक मावळ संस्था, आपदा मित्र मावळ, शिवदुर्ग मित्र लोणावळा येथील रेस्क्यू टीम घटनास्थळी दाखल झाली. निलेश गराडे, अनिल आंधळे, शुभम काकडे, भास्कर माळी, सुरज शिंदे, गणेश गायकवाड, गणेश गराडे, ओंकार भेगडे, आकाश पवार, कमल परदेशी यांनी सुरजचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. याबाबत अधिक तपास पोलीस करीत आहेत.