पुरंदर | शबनम न्यूज
बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार या आज पुरंदर तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. पुरंदर तालुक्यातील भुलेश्वर मंदिरात दर्शन घेत सुनेत्रा पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात झाली.. या दौऱ्यात माजी मंत्री विजय शिवतारे हेही सहभागी झाले. सुनेत्रा पवार आणि विजय शिवतारे हे प्रथमच एकत्रित गाव भेट दौरा करत आहेत..
सकाळी भुलेश्वराचं दर्शन घेवून सुनेत्रा पवार यांनी आपल्या दौऱ्याला सुरुवात केली. या दौऱ्यात माजी आमदार अशोक टेकवडे, बाबाराजे जाधवराव, दिगंबर दुर्गाडे, जालिंदर कामठे, दत्ता झुरंगे, मोनिका हरगुडे, वामन जगताप, उत्तम धुमाळ, निलेश जगताप, हरीभाऊ लोळे, विराज काकडे आदींसह महायुतीच्या घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले.
पुरंदर तालुक्यातील प्रलंबित प्रश्नांबद्दल अजितदादा स्वत: पुढाकार घेणार आहेत. त्या अनुषंगाने त्यांनी शब्दही दिलेला आहे. त्यामुळे पुरंदरमधील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्याबरोबरच विकासाची अनेक कामे होणार असल्याचं सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं. आज महायुतीचे सर्व नेते एकत्रितपणे काम करत आहेत ही अत्यंत समाधानाची आणि विजयाची खात्री देणारी बाब असल्याचंही सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितलं.
पुरंदरच्या प्रलंबित प्रश्नांचा निपटारा करण्याचा शब्द अजितदादांनी दिला आहे. अजितदादा जो शब्द देतात तो पूर्णच करतात. त्यामुळं बारामतीप्रमाणेच पुरंदरचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नसल्याचं माजी मंत्री विजय शिवतारे यांनी नमूद केलं. यावेळी त्यांनी पुरंदरच्या पाणी प्रश्नाबद्दलही सरकार सकारात्मक असल्याचेही त्यांनी सांगितले.
भावनेवर जग चालत नाही, विकास महत्वाचा आहे.. त्यातूनच सर्वांची प्रगती होत असते ही बाब लक्षत घेवून विकासाला महत्व देणाऱ्या अजितदादांचे हात मजबूत करण्यासाठी सुनेत्रावहिनींना घड्याळ चिन्हासमोरील बटण दाबून निवडून देण्याचं आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांनी केलं.
पुरंदर तालुक्यातील माळशिरस, राजुरी, पिसर्वे, नायगाव, बेलसर, साकुर्डे आदी गावात सुनेत्रा पवार यांनी दौरा करत ग्रामस्थांशी संवाद साधला.