शबनम न्युज | पुणे
पुण्यातील विशेष न्यायालयाने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात ११ वर्षांनी निकाल जाहीर केला आहे. या प्रकरणात एकूण पाच आरोपी होते. त्यापैकी सचिन अंदूरे आणि शरद कळसकर या दोन मारेकऱ्यांना दोषी मानून विशेष न्यायाधीशांनी या दोघांना जन्मठेप सुनावली आहे. त्याचबरोबर पाच लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आला आहे.
तसेच या प्रकरणातील उर्वरित तीन आरोपी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे यांची सबळ पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
यावेळी मुक्ता दाभोलकर म्हणाल्या, तब्बल ११ वर्षे विवेकाच्या मार्गाने आपण ही लढाई लढलो आणि आता न्याय आपल्या दृष्टीपथात आला आहे. ही भावना आमच्यासह सर्वांच्या मनात कायम जागृत राहील. मारेकऱ्यांना शिक्षा सुनावली. याबद्दल आम्ही समाधानी आहोत. मात्र ज्या तिघांना शिक्षा झाली नाही त्यांच्याविरोधात आम्ही उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊ. आमचे वकील अभय नेटगी यांच्या मार्गदर्शनात आतापर्यंतची आमची वाटचाल चालू होती, जी पुढेही चालू राहील.