युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख तर महिला अध्यक्षपदी सौ. कविता आल्हाट
शबनम न्यूज : पिंपरी चिंचवड (दि.१२ फेब्रुवारी) :- पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने संघटनेत फेरबदल करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शहराध्यक्षपदाच्या दोन टर्म पूर्ण झालेल्या संजोग वाघेरे यांना पदमुक्त करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसने नवीन चेहऱ्यांना संधी देत त्यांच्या जागी नगरसेवक अजित गव्हाणे यांची शहराध्यक्षपदी नियुक्ती केली. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाने अजित गव्हाणे यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवली आहे. युवक शहराध्यक्षपदी इम्रान शेख आणि महिला शहराध्यक्षपदी प्रा. कविता आल्हाट यांना संधी मिळाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी या नियुक्त्या केल्या आहेत. याशिवाय, शहरातील तीन विधानसभानिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. अजित गव्हाणे यांना शहराध्यक्ष पद मिळाल्यांनतर त्यांचे सर्वत्र अभिंनदन होत आहे.
याबाबत आज सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात तातडीने बैठक घेतली आणि नवीन कार्यकारणी जाहीर केली.उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे पत्र नवनिर्वाचित शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्याकडे सुपूर्द केले.
तीनही विधानसभा मतदारसंघनिहाय कार्याध्यक्ष नेमण्यात आले आहेत. पिंपरी विधानसभा मतदारसंघातून माजी नगरसेवक जगदीश शेट्टी, चिंचवड विधानसभा मतदारसंघातील माजी नगरसेवक प्रशांत शितोळे आणि भोसरी मतदारसंघातील नेहरूनगर येथील नगरसेवक राहुल भोसले यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
तर, युवकच्या कार्याध्यक्षपदी निलेश निकाळजे,प्रसन्न डांगे आणि योगेश गवळी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महिला कार्याध्यक्षपदी ज्योती गोफणे,सविता धुमाळ आणि उज्वला ढोरे यांची निवड करण्यात आली आहे.