पुणे :
‘फ्रंटियर गांधी : बादशाह खान,ए टॉर्च ऑफ पीस’ या माहितीपटाच्या सादरीकरणाने ६ मे रोजी शुक्रवारी सायंकाळी उपस्थितांची मने भारावून गेली. गांधी भवन(कोथरूड,पुणे) येथे हा माहितीपट दाखवण्यात आला.
महाराष्ट्र गांधी स्मारक निधी, युवक क्रांती दल आणि ‘सृष्टी’ या संस्थांनी विशेष पुढाकार घेऊन या दुर्मिळ माहितीपटाचे सादरीकरण केले . या माहितीपटानंतर दिग्दर्शिका श्रीमती टेरी मॅकलुहान यांच्याशी अमेरिकेतून थेट संवाद साधण्यात आला.
संयोजन समितीच्या वतीने संदीप बर्वे, प्रशांत कोठडीया यांनी स्वागत केले. प्रसाद झावरे , रेश्मा सांबारे यांनी प्रास्ताविक केले.
सभागृहात डॉ.कुमार सप्तर्षी, अन्वर राजन, संदेश भंडारे, सचिन पांडुळे आदी मान्यवर उपस्थित होते.
२० वर्षांच्या परिश्रमातून हा माहितीपट २००८ मध्ये पूर्ण झाला. मात्र जागतिक स्तरावरील विविध पुरस्कार मिळवलेला हा माहितीपट भारतामध्ये आजवर केवळ एक ते दोन शहरातच दाखवला गेला असल्यामुळे पुण्यात सादरीकरण आयोजित करण्यात आले .
ऑनलाईन संवाद साधताना टेरी मॅकलुहान म्हणाल्या, ‘ खान अब्दुल गफार खान यांनी ३५ वर्ष तुरुंगवास भोगला. लढावू समुदायाला त्यांनी अहिंसेची दीक्षा दिली.ते देवदूतासारखे होते. मानवतेला त्यांनी दिलेले योगदान विसरता येणार नाही.
*’फ्रंटियर गांधी : बादशाह खान’ : भारावून टाकणारा अनुभव*
……………..
‘सरहद गांधी’ म्हणून जगप्रसिद्ध असलेले पख्तुनी नेते खान अब्दुल गफार खान उर्फ ‘बादशाह खान’ हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक अग्रगण्य नेते आणि महात्मा गांधी यांचे एकनिष्ठ अनुयायी होते. तत्कालीन भारताच्या वायव्य सरहद्द प्रांत या भागात सामान्य नागरिकांची शांतीसेना उभारून ’खुदा-ई- खिदमतगार’ या संघटनेच्या माध्यमातून बादशाह खान यांनी ब्रिटीश सत्तेविरोधात जो अहिंसक लढा पुकारला तो स्वातंत्र्यलढ्यातील एक देदिप्यमान काळ होता. आणि संपूर्ण जगाचे लक्ष त्यांच्या कार्याकडे वेधले गेले.त्यांच्या जीवनकार्यामुळे प्रभावित झालेल्या जगभरातील असंख्य लोकांपैकी एक अभ्यासक श्रीमती टेरी मॅकलुहान यांनी त्यांच्या जीवनकार्याचा जगाला परिचय करून देण्यासाठी माहितीपटाची निर्मिती केली. तो पाहून उपस्थित भारावून गेले