शबनम न्युज | मुंबई
संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेत प्रवेश करण्यास नकार दिल्याने शिवसेनेने सहाव्या जागेसाठी कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी मंगळवारी संजय पवार यांचं नाव जाहीर केलं.
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांचं नाव जाहीर केल्यानंतर आज संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार उद्या दुपारी एक वाजता राज्यसभेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरणार असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली.
दरम्यान, संजय पवार गेली ३० वर्षे शिवसेनेचे निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. महापालिकेचे माजी नगरसेवक ते आता थेट राज्यसभेचेच संभाव्य उमेदवार अशी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची चढती कमान आहे. खरे तर त्यांच्यासारख्या कार्यकर्त्याचे या उमेदवारीसाठी पक्षाकडून नाव चर्चेत येणे हाच मोठा बहुमान असल्याची भावना शिवसेनेतून व्यक्त होत आहे.